रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हावासियांच्या चिंतेत आता दिवसेंदिवस भर पडताना दिसत आहे. कारण कोरोनाची आकडेवारी आता दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाने आता थेट पोलीस अधीक्षक कार्यालय आणि कारागृहात देखील शिरकाव केला आहे. रत्नागिरी जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, त्यांची प्रकृती उत्तम असून त्यांना घरीच क्वारंटाईन करून ठेवले गेले आहे. जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. पण, त्यांची स्वॅब तपासणी केली असता त्यांचा कोरोना रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे सरकारच्या नव्या मार्गदर्शक तत्वानुसार त्यांच्यावर घरीच उपचार केले जाणार आहेत.
 दरम्यान, आता पोलीस अधीक्षक कार्यालयातील इतर कर्मचाऱ्यांचे स्वॅब देखील आता तपासले जाणार आहेत. कोविड योद्ध्यांना कोरोनाची लागण झाल्याचे ही घटना पहिलीच नसून यापूर्वी देखील जिल्ह्यातील काही पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. या कोरोनाचा शिरकाव आता कारागृहात देखील झाला असून विशेष कारागृहातील आठ कैद्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. रत्नागिरीच्या या विशेष कारागृहात 136 कैदी असून आणखी काही कैद्यांचे अहवाल हे प्रतिक्षेत असल्याची माहिती देखील समोर येत आहे.

काय आहे जिल्ह्याची स्थिती?

रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 47 जणांचे कोरोना रिपोर्ट हे पॉझिटिव्ह आढळून आले आहे. जिल्ह्याचा विचार करता 47 हा आकडा हा आजवरचा सर्वाधिक आकडा ठरला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 661 वर पोहोचला आहे. दरम्यान 450 देखील जास्त रूग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. तर, आज रोजी जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रूग्णांचा आकडा हा 150च्या देखील पुढे गेला आहे. तर आतापर्यंत 26 जणांना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात लॉकडाऊन

रत्नागिरी जिल्ह्यात 1 जुलै ते 8 जुलै या कालावधीत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आलेली आहे. रत्नागिरी आणि दापोलीमध्ये आढळून आलेल्या रूग्णांची कोणतीही ट्र्व्हल हिस्ट्री आढळून आलेली नाही. त्यामुळे संभाव्य कम्युनिटी स्प्रेड टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, या काळात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार असून खासगी वाहनं आणि जिल्ह्याच्या सीमा देखील बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्वत्र लॉकडाऊन असून नागरिकांनी देखील गरजेशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आले आहे.