Beed News : अनेकदा मुलं आपल्या आई-वडीलांना घराबाहेर काढून देत असल्याचा घटना घडतात. मात्र बीड जिल्ह्यात (Beed District) चक्क एका आमदाराने आपल्या वडिलांना धक्काबुक्की करत घराबाहेर हाकलून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.


तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले? असे म्हणत बीडचे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांनी त्यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की करत घराबाहेर हाकलून दिल्याची माहिती मिळत आहे. तसा आरोपच संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी केला आहे. बीडच्या नगर रोडवरील निवासस्थानी मंगळवारी सकाळी हा प्रकार घडला असून, या प्रकरणी बीड शहरातील शिवाजीनगर ठाण्यात आमदार संदीप क्षीरसागर, अर्जुन क्षीरसागर यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मंगळवारी, 11  एप्रिल रोजी माझ्या बहिणी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास घरी आल्या होत्या. त्यावेळी आमदार संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर यांनी, तुम्ही तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले? असे म्हणत माझी कॉलर धरून धक्काबुक्की केली. माझ्यासह माझ्या बहिणींनाही घराबाहेर हाकलून दिले. त्यामुळे रवींद्र क्षीरसागर यांच्या तक्रारीवरून शिवाजी नगर पोलीस ठाण्यात संदीप क्षीरसागर आणि अर्जुन क्षीरसागर या दोघांविरोधात कलम 323, 504, 506, 34 भादंविनुसार अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक गुरले करत आहेत.


कौटुंबिक वाद चव्हाट्यावर


माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे पुतणे संदीप क्षीरसागर यांच्यातील काका-पुतण्याच्या वाद राज्यभरात चर्चेचा विषय बनला होता. त्यामुळे क्षीरसागर कुटुंबातील वादाची नेहमी चर्चा होत असते. मात्र याच क्षीरसागर कुटुंबात आता पिता-पुत्राचा वाद समोर आला आहे. रवींद्र क्षीरसागर यांनी आपल्या आमदार पुत्रा विरोधात पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. तर, तुमच्या बहिणींना घरी का येऊ दिले असे म्हणत आपली कॉलर पकडून धक्काबुक्की केल्याचा गंभीर आरोप देखील त्यांनी केला आहे. तर संदीप  क्षीरसागर यावेळी दारूच्या नशेत असल्याचं देखील त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे आतापर्यंतचा क्षीरसागर कुटुंबातील काका-पुतण्याच्या असलेला वाद आता पिता पुत्राच्या वादावर येऊन पोहचला आहे. तर रवींद्र क्षीरसागर यांनी पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर पुन्हा एकदा क्षीरसागर कुटुंबातील वाद चव्हाट्यावर आल्याची चर्चा पाहायला मिळत आहे.  दरम्यान यावर संदीप क्षीरसागर यांची कोणतीही प्रतिक्रिया आलेली नसल्याने त्यांची भूमिका स्पष्ट होऊ शकली नाही..   


इतर महत्वाच्या बातम्या: 


Dhananjay Munde : मुंडे बहिण-भाऊ एकाच व्यासपीठावर, आमच्या घरात तसूभरही अंतर नाही; धनंजय मुंडेंच्या वक्तव्यानं चर्चांना उधाण