मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला (Rashmi Shukla letter) यांनी राज्यातील जनतेला उद्देशून पत्र लिहिलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर अपलोड करण्यात आलं आहे. जनतेचा पोलीस दलावरील (Maharashtra Police) विश्वास कमी झाल्याची कबुली स्वतः पोलीस महासंचालकांनी पत्राद्वारे दिली आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असताना पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांचं हे पत्र चर्चेत आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास जिंकण्याची आमची जबाबदारी आहे, असं रश्मी शुक्ला यांनी पत्रात म्हटलं आहे.
रश्मी शुक्ला यांच्या पत्रात नेमकं काय?
संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाची सुरक्षा सुनिश्चित करणे हे माझे प्राधान्य आहे. माझा विश्वास आहे की आम्ही सेवा करत असलेल्या जनतेचा विश्वास आणि पाठिंबा जिंकल्याशिवाय आमचे कार्य कुचकामी आहे. पण या गोष्टीची दखल घेणे अत्यावश्यक वाटते की काही स्तरावर जनतेचा आपल्या पोलिस दारावरील विश्वास कमी झाला आहे. भूतकाळातील चुका मागे टाकून तुमचा विश्वास परत जिंकणे ही आमची जबाबदारी आहे. आम्ही तुम्हाला खात्री देतो की, राज्यातील सर्व पोलीस तुकड्या तुमचे आणि तुमच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी तत्परतेने काम करत आहेत आणि करत राहतील.
पोलीस महासंचालक पदावर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती
आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक आहेत. . राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते. रश्मी शुक्ला या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीय समजले जातात. रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या IPS अधिकारी आहेत. महाराष्ट्र पोलिसातील सर्वात वरिष्ठ IPS अधिकार्यांपैकी एक, आहेत. सशस्त्र सीमा बल (SSB) चे केंद्रप्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली. त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणूनही त्यांनी काम केले. रश्मी शुक्ला यांचे नाव राज्यातल्या फोन टॅपिंग प्रकरणामध्ये चर्चेत आले होते. महाविकास आघाडीचं (Maha Vikas Aghadi) सरकार असताना फोन टॅपिंग प्रकरणाची चौकशी सुरू झाली होती.
ही बातमी वाचा :
Bharat Ratna: राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर बाळासाहेब ठाकरेंनाही भारतरत्न द्या : राज ठाकरे