यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या झरी तालुक्यातील शिबला ते पारडी या रस्त्याचे रुंदीकरणाचे काम सुरु असताना याच मार्गावर भौगोलिक दृष्टीने महत्त्वाचे असे दुर्मिळ दगडी खांब सापडले आहेत. त्यामुळे हे खांब परिसरात कुतुहलाचा विषय ठरत आहे. सहा कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर लाव्हारसाचा उद्रेक झाला तेव्हा तो लाव्हा रस वाहत वाहत विदर्भाच्या या भागात आला होता. तो लाव्हा अचानकपणे पाण्यात पडल्याने तो थंड झाला आणि त्यामुळेच असे लांब खडक येथे तयार झाले. भौगोलिक दृष्टीने हे खडक अतिशय महत्त्वाचे आहेत, असं पुरातत्व व भुशास्त्र अभ्यासक प्राध्यापक सुरेश चोपणे यांनी म्हटले आहे.
सहा वर्षांआधीही या परिसरात अशा प्रकारचे दगड (खांब) त्यांना सापडले होते. त्यामुळे या परिसराला भौगोलिक दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे संशोधक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले आहे. हे खांब लांबसडक आणि हे षटकोणी असून ते हुबेहुब कोरले असल्यासारखे भासतात. त्यामुळे फार वर्षापूर्वी हे खांब कुठल्या तरी ऐतिहासिक बांधकाम करण्यासाठी आणले असल्याचे तर्क लावले जातात. पण ते निरर्थक आहे असेही संशोधन सांगतात.
सहा वर्षांआधी या परिसरात संशोधन करत असताना त्यांना असे खांब आढळून आले होते. त्याचा अभ्यास केला असता सदर खांब भौगोलिक पद्धतीने तयार झाल्याचे आढळून आले. सदर खांबांना 'कॉलमनॉर बेसॉल्ट' म्हटले जाते. ज्याला सोप्या भाषेत आपण ज्वालामुखीतून तयार झालेले दगडी खांब म्हणतात.हे खांब भौगोलिक असल्याने त्याला पौराणिक किंवा धार्मिक दृष्टीकोणातून कुणीही बघू नये, असेही पुरातत्व व भुशास्त्र अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी म्हटले आहे. सध्या हे खांब अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र झाले आहे.
भौगोलिक दृष्टीने या ठिकाणी असलेल्या या खांबांना कॉलमनॉर बेसॉल्ट' म्हणतात. पुढे भूगर्भातील अभ्यासकांना, विद्यार्थ्यांना, संशोधकांना येथील अभ्यासातून भूगर्भात करोडो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या पोटात काय घडामोडी झाल्यात ते निरीक्षण करायचे असल्यास त्याचा संशोधन दृष्टीने उपयोग होऊ शकतो. त्यामुळे हे जतन करून ठेवण्याची आवश्यकता असल्याचे प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले आहे. त्यामुळे येत्या काळात या ठिकाणाला जिल्हा प्रशासन कशा पद्धतीने याचे संरक्षण आणि जतन करून ठेवते याकडे सर्वांचे लक्ष राहणार आहे.