जळगाव :  राज्याच्या विविध भागांमध्ये इतिहासाच्या अनेक पाऊलखुणा आढळून येत असतात. खान्देशमधील जळगाव जिल्ह्यात देखील ऐतिहासिक ठेवा मोठ्या प्रमाणात आहे. मागच्याच आठवड्यात जळगावच्या धरणगावात ऐतिहासिक गोलाकार शिलालेख आढळल्यानंतर आज महाराष्ट्र-मध्य प्रदेश या मार्गावर असलेल्या यावल गावात हजारो वर्षापूर्वीचे पुरातत्वीय अवशेष आढळून आले आहेत. 

यावल गावात हडकाई आणि खडकाई नदीच्या संगमाजवळच असणाऱ्या टेकडीवर एक गढी बांधण्यात आलेली आहे. या गढीला मराठा कालखंडातील राजे निंबाळकर गढी किंवा निंबाळकर राजेंचा किल्ला असेही म्हणतात. ही गढी गावाच्या बाहेर असून नदीच्या किनाऱ्यावर आहे. गढीकडे जाताना आपल्याला न्यायालय दिसते. या न्यायालयाची इमारत गढीच्या एकदम बाजूलाच उभी आहे. न्यायालयाजवळ पोहोचल्यावर डाव्या बाजूला किल्ल्याचे दोन भव्य बुरुज आणि तटबंदी आपल्याला दिसतात.

Exclusive : जळगाव जिल्ह्यातील धरणगावात ऐतिहासिक ठेवा! ब्रिटिश सेनापती औट्राम यांचा दुर्मिळ गोलाकार शिलालेख मिळाला

आज या ठिकाणी जळगाव येथील हेरीटेज फाउंडेशनचे संचालक व दख्खन पुरातत्व व सांस्कृतिक संशोधन केंद्र हैद्राबाद येथील संचालक भुजंगराव बोबडे, महाराष्ट्र राज्यकर सहाय्यक आयुक्त समाधान महाजन, पार्थ महाजन यांनी भेट दिली असता त्यांना अनपेक्षितपणे या ठिकाणी हजारो वर्षापूर्वीचे पुरातत्वीय अवशेष आढळून आले. विशेष बाब म्हणजे हजारो वर्षापूर्वीपासून ते उत्तर मध्ययुगीन कालखंडापर्यंतचे अवशेष इथे आढळले आहेत जी एक अत्यंत दुर्मिळ बाब आहे, असं बोबडे यांनी सांगितलं आहे.

पहिल्यांदाच पुरातत्वीय अवशेष मिळाल्याचा दावा

इतिहास अभ्यासक असलेल्या बोबडे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितलं की, या बुरूजापासून गढीवर जात असताना अगदी अनपेक्षितपणे पायाखाली काही झिलई असलेली चमकदार लाल-तांबड्या रंगाची खापरे आम्हाला इथे मिळाली. अजून बारकाईने पाहिले असता इथे केवळ लाल-तांबड्या रंगाची खापरे नसून, गडद काळ्या रंगाची चमकदार खापरे दिसून आली. त्यामुळे खूपच आनंद झाला. कारण आतापर्यंत हे ठिकाण केवळ उत्तर एक मध्ययुगीन वा मराठा कालखंडातील गढीचे ठिकाण म्हणून ओळखले जात होते. परंतु पहिल्यांदाच इथे असे पुरातत्वीय अवशेष मिळाले आहेत, असा दावा बोबडे यांनी केला आहे. 

केंद्रीय पुरातत्व विभागाला दिली माहिती

इ.स. 1788 च्या सुमारास बांधलेल्या या गढीचा विस्तार 75.6 मी. लांब, 68.4 मी. रुंद व 45 मी. उंच असा आहे. यापैकी केवळ 200 ते 300 चौरस फुटात त्यांनी ही पाहणी केली व त्यात हे अवशेष आढळून आले. संपूर्ण परीसराचे व नदीकाठावरील पांढर्‍या मातीच्या टेकड्यांची पाहणी केली व उत्खनन केले तर निश्चित प्राचीन काळातील अजून काही अवशेष येथे मिळू शकतील. याची माहिती केंद्रीय पुरातत्व विभाग औरंगाबाद कार्यालय तसेच महाराष्ट्र राज्य पुरातत्व व वस्तुसंग्रहालये संचालनालय, मुंबई यांना देण्यात आलेली आहे, असं देखील बोबडे यांनी एबीपी माझा डिजिटलशी बोलताना सांगितलं.