नागपूर : मोबाईलवर कुणाशी बोलते... शाळकरी विद्यार्थ्यांनी मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर करू नये... कुटुंबीयांच्या अशा प्रश्नांनी आणि सल्ल्याला वैतागून घर सोडून निघून गेलेल्या 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. नागपुरातील ही घटना आहे.


नागपुरातील धम्मदीप नगरात राहणारी पीडित मुलगी नवव्या वर्गात शिकते. सारखी फोनवर बोलत असल्यामुळे तिचा भाऊ तिच्यावर रागावला. शिवाय शाळकरी विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा एवढा वापर करु नये, असा सल्लाही त्याने दिला. भावावर रागावलेल्या या मुलीने कुणालाही न सांगता घर सोडलं.

रात्री 9 वाजेपर्यंत ती इकडे-तिकडे भटकत राहिली. रात्री पाऊस सुरु झाल्यामुळे भटकून हतबल झालेल्या पीडित मुलीने तिची व्यथा समता नगरात 40 वर्षीय राजेश कडवेला सांगितली आणि रात्रभरासाठी आश्रय मागितला. सकाळी तुला तुझ्या घरी सोडतो असं सांगून राजेशने तिला आश्रय दिला.

एका रात्रीचा आश्रय देणाऱ्या राजेशच्या मनात वेगळंच काही तरी होतं. पीडित मुलगी झोपी गेल्यानंतर रात्री तिच्यावर 3 वेळा बलात्कार करण्यात आला. सकाळी पीडित मुलीने स्वतःची सुटका करून घेत भावाला संपर्क साधत सर्व घटना सांगितली.

त्यानंतर कुटुंबीयांच्या मदतीने पीडित मुलीने जरीपटका पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी 14 वर्षीय पीडितेची वैद्यकीय चाचणी केली असून वैद्यकीय अहवालाच्या आधारावर राजेशवर अपहरण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली.