Ranjitsinh Disale News : ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले हे 2017 ते 2020 या काळात गैरहजर होते असा ठपका जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या फेरतपासणी अहवालात ठेवण्यात आला आहे. तर दुसरीकडे हा निष्कर्ष खोटा असल्याचा दावा डिसले यांनी केला आहे. समितीचा निष्कर्ष आणि डिसले यांचा दावा याची पडताळणी एबीपी माझानं केली तेव्हा वेगळीच माहिती समोर आली आहे. सोलापूरच्या विज्ञान केंद्रात रणजितसिंह डिसले यांनी काम केल्याची माहिती क्यूरेटर राहुल दास यांनी दिली आहे. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेनं विज्ञान केंद्राला एक पत्र दिलं असून त्यात डिसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या कामाचा तपशिलही देण्यात आला आहे. त्यानंतर सिंहगड इन्स्टिट्यूटमध्येही डिसले यांनी काम केल्याची माहिती महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने फेरतपासणी केलेल्या अहवालात डिसले हे विज्ञान केंद्र आणि सिंहगड इन्स्टिट्युट या ठिकाणी देखील उपस्थित होते याबाबत कोणतेही कागदपत्र सादर केलेले नाहीत असे निष्कर्ष नोंदवलेत. मात्र यातील प्रत्येक निष्कर्ष हा खोटा असल्याची प्रतिक्रिया डिसले यांच्या वतीने देण्यात आली. समितीच्या या निष्कर्षाची आणि डिसले यांच्या दाव्याची पडताळणी एबीपी माझाने केली, त्यावेळी वेगळीच माहिती समोर आली. विज्ञान केंद्रात रणजितसिंह डिसले यांनी काम केल्याची माहिती क्यूरेटर राहुल दास यांनी दिली आहे. तसेच सिंहगड इन्स्टिट्यूटमध्येही डिसले यांनी काम केल्याची माहिती महाविद्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
देवेंद्र फडणवीसांचं डिसले गुरुजींना बोलावणं
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी रणजितसिंह डिसले गुरुजींना (Ranjitsinh Disale Guruji) भेटण्यासाठी बोलावलं आहे. भाजपचे आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय गिरीष महाजन (Girish Mahajan) यांनी डिसले गुरुजींना याबाबत फोन केला होता. डिसले गुरुजी आज देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असल्याची माहिती आहे.
रणजितसिंह डिसलेंवर काय ताशेरे आहेत
रणजितसिंह डिसले प्रतिनियुक्तीच्या ठिकाणी एक ही दिवस हजर नव्हते
प्रतिनियुक्तीवेळी केवळ सही पुरता कारभार सोपवून नियमबाह्य आर्थिक व्यवहार
डिसले यांच्या खुलाश्यात त्यांनी ऑनलाईन काम केल्याचे दिसते
मात्र ऑनलाइन काम करण्यासंदर्भात कोणतेही आदेश नाहीत
डिसलेंना जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उपक्रमाचा लाभ द्यायचा होता
मात्र डिसलेंनी देशाबाहेरील विद्यार्थ्यांना शिकवून कराराचे उल्लंघन केले
एन्ट्री मस्टर, उपस्थिती पत्रक, शेरे बुक यापैकी कोणत्याही अधिकृत हजेरी पत्रकावर डिसले यांची नोंद नाही
डिसलेंकडून सगळ्या आरोपांचा इन्कार
रणजितसिंह डिसलेंनी या सगळ्या आरोपांचा इन्कार केला आहे यातली प्रत्येक बाब खोटी आहे. अहवाल बाहेर कसा आला? ज्यावेळी मला विचारणा होईल, त्यावेळेस खुलासा दिला जाईल. मला अहवाल अद्याप दिलेला नाही, असं त्यांच्याकडून कळलं आहे.
डिसले यांच्या प्रशासकीय चुका कशा झाल्या. याची चौकशी करुन त्यांच्याकडून पगारापोटी घेतलेले 17 लाख वसूल करण्याचा शिक्षण विभागाचा इरादा आहे. आणि दुसरीकडे या सरकारी कारवाई आणि चौकशीला कंटाळून डिसलेंनी राजीनामा धाडलेला आहे. एका प्रयोगशील शिक्षकाची किंमत परदेशातल्या लोकांनी ओळखली आपण मात्र तो कुठे चुकला हेच हेरुन त्याला नामोहरम करण्याची एकही संधी सोडत नाही आहोत. प्रयोगशीलतेला टाचेखाली चिरडण्याचा एक कलमी कार्यक्रम सध्या सुरु असल्याचं दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Ranjitsinh Disale : डिसले गुरुजींचा राजीनामा, अपयश कोणाचे? व्यवस्थेचे की काही नवं करू पाहणाऱ्यांचे
- Girish Mahajan : राजीनामा देऊ नका, देवेंद्र फडणवीसांचं डिसले गुरुजींना बोलावणं
- Ranjitsinh Disale : रणजित डिसलेंच्या वेतनवसुलीचा निर्णय घाईगडबडीने घेणार नाही, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची माहिती