सोलापूर : जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजीत डिसले  यांच्या वेतनवसुलीचा निर्णय घाईगडबडीने घेणार नसून त्याची शहानिशा करून तपासणी करूनच निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलीप स्वामी यांनी एबीपी माझाला दिली आहे. 


रणजीत डिसले यांच्याकडून तीन वर्षाच्या पगाराची वसुली केली जाण्याची शक्यता आहे.   प्रतिनियुक्तीवर असताना काम केले नाही असे सांगून डिसले यांच्याकडून 17 लाख रूपये प्रशासन वसूल करणार आहे. याविषयी विचारले असता कोणत्याही कर्मचाऱ्यावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी आम्ही घेतोय,  असे दिलीप स्वामी यांनी स्पष्ट केले आहे. 


मुख्य कार्यकारी अधिकारी  दिलीप स्वामी म्हणाले, रणजीतसिंह डिसले यांच्या विरोधात एक अहवाल प्राप्त झाला होता. मात्र कोणत्याही कर्मचाऱ्यावर  अन्याय होऊ नये म्हणून मी दुसऱ्यांदा अहवाल सादर करायला सांगितला. तो अहवाल प्राप्त झाला आहे. प्रत्येक मुद्द्यावर पुराव्यासह तपासणी करा त्यानंतरच फेरअहवाल सादर करावे असे आदेश मी दिले होते. त्यानंतर नियुक्त केलेल्या समितीचा दुसरा अहवालही प्राप्त झालेला आहे मात्र तो अद्याप माझ्यापर्यंत आलेला नसून, मी पाहिलेला नाही. ज्या पद्धतीने अहवाल येईल त्याची शहानिशा करून नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.


स्वामी म्हणाले,   रणजीतसिंह डिसले यांचा राजीनामा आल्याची माहिती मला शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. 6 जुलै रोजी डिसले गुरुजींनी राजीनामा दिलेला आहे. वैयक्तिक कारणास्तव मी राजीनामा देत असल्याचे डिसले यांनी सांगितले.  8 ऑगस्ट रोजी कार्यमुक्त करण्याची विनंती डिसलेंनी केली आहे.  रणजीतसिंह डिसले यांनी एक महिन्याची रीतसर नोटीस दिली आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे एक महिन्यात कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जाईल. राजीनामा मंजूर करण्यासंदर्भात नियमानुसार कार्यवाही होईल. 


काय आहे आरोप?


जागतिक पुरस्कार विजेते सोलापूरचे शिक्षक रणजीत डिसले यांच्याकडून तीन वर्षाच्या पगाराची वसुली केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या शाळेतील अनुपस्थितीच्या काळातील वेतनवसुली व्हावी, अशी शिफारस असलेला अहवाल जिल्हापरिषदेला सादर चौकशी अहवालात करण्यात आलाय. डिसले गुरुजींनी अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी तीन वर्षांची अध्ययन रजा घेतली होती.  मात्र यासाठी आवश्यक कागदपत्रं सादर न करता ही रजा मागितल्याचा आरोप आहे.