Pradhan Mantri Fasal Bima Yojana : प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार (Dheeraj Kumar) यांनी दिली आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणच्या शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्याबाबत कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
महाराष्ट्र राज्यात 2022-23 या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. या योजनेत सहभाग घेण्यासाठी ई-पीक पाहणी नोंद सक्तीची नसल्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी स्पष्ट केलं आहे. खरीप-2022 मध्ये या योजनेत भाग घेण्याचा अंतिम दिवस 31 जुलै 2022 आहे. शासनाच्या ई-पीक पाहणीमध्ये पीक पेऱ्याची नोंद घेण्याची कार्यवाही 1 ऑगस्ट 2022 पासून सुरु होत आहे. पीक विमा योजनेत सहभाग घेण्यासाठीही पीक पाहणीची नोंद आवश्यक असल्याबाबत काही ठिकाणी शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला असल्याचे नवले म्हणाले.
पीक विमा योजनेत भाग घेत असताना काही वेळेस पिकाचा विमा काढलेले पीक आणि प्रत्यक्ष शेतात असलेले पीक यामध्ये तफावत आढळते. अशा परिस्थितीत शेतकरी पीक विमा नुकसान भरपाईपासून वंचित राहतो. शेतकऱ्यांनी शेतात घेतलेले पीक व विमा हप्ता भरताना नोंदवलेले पीक यामध्ये काही तफावत आढळल्यास सदर शेतकऱ्याने पीक पाहणीमध्ये केलेली नोंदही अंतिम गृहीत धरण्यात येईल असा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे. त्यामुळं पीक विमा योजनेत सहभाग घेताना ई-पीक पाहणीमध्ये पिकाची नोंद असलेला दाखला असण्याची आवश्यकता नसल्याची माहिती धीरज कुमार यांनी दिली. सदर शेतकरी स्वयंघोषणा पत्राद्वारे पीक विमा योजनेत सहभाग घेऊ शकतो. मात्र 1 ऑगस्ट 2022 नंतर त्यांनी ई-पीक पाहणीमध्ये आपल्या पिकांची नोंद करावी असे आवाहन आयुक्त धीरज कुमार यांनी केले आहे.
शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई मिळावी या दृष्टीनं कमी प्रीमियममध्ये पंतप्रधान पीक विमा योजना सुरु करण्यात आली आहे. या विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानीसाठी अल्प प्रीमियमवर विमा संरक्षण दिले जाते. जर कोणत्याही आपत्तीमुळे तुमच्या पिकावर परिणाम झाला असेल, तर तुम्हाला नुकसान भरपाई दिली जाते.
महत्त्वाच्या बातम्या:
- Commissioner Agriculture : शेतकऱ्यांनी अडवला कृषी आयुक्तांचा ताफा, बियाणांसह खतांच्या खरेदीत शेतकऱ्यांची फसवणूक
- Dheeraj Kumar : 75 ते 100 मिलीमिटर पाऊस झाल्यानंतरच सोयाबीनची पेरणी करावी, कृषी आयुक्त धीरज कुमार यांचं शेतकऱ्यांना आवाहन
- kharif season: प्रधानमंत्री पीक विमा योजनेत 31 जुलैपर्यंत सहभागी होण्याचं शेतकऱ्यांना आवाहन