सातारा : शिवसेना आता वाघासारखी राहिलेली नाही, शिवसेना बकरीसारखी झाली आहे, असा टोला केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे नेते रामदास आठवले यांनी लगावला आहे. रामदास आठवले यांनी आज साताऱ्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी आठवले यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडीला लक्ष्य केले.


रामदास आठवले म्हणाले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) शिवसेना विरोध करत आहे. याचाच अर्थ भारतात घुसलेल्या बांगलादेशींना उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा आहे. स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल शिवसेनेने घेतलेली भूमिकादेखील अत्यंत चुकीची आहे. काँग्रेसच्या दबावामुळेच शिवसेनेच्या भूमिका बदलल्या आहेत.


आठवले म्हणाले की, शिवसेना सध्या काँग्रेसच्या दबावाखाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या CAA आणि सावरकरांबद्दल्या भूमिका बदलल्या आहेत. तिन्ही पक्षांमध्ये (शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी) अंतर्गत मतभेद आहेत. त्यामुळे राज्यात सत्ता टिकवण्यासाठी शिवसेनेला हे सगळं करावं लागत आहे. परंतु या युतीची (महाविकास आघाडीची) माती झाल्याशिवाय राहणार नाही.


आठवले म्हणाले की, शिवसेना आता पूर्वीसारखी राहिली नाही. वाघासारखी डरकाळ्या फोडणारी शिवसेना राहिली नाही. ही शिवसेना आता बकरीसारखी झाली आहे. हा पक्ष काँग्रेसच्या दबावात आहे. शिवसेनेला आमचं आवाहन आहे, जर तुम्हाला ताठ मानेने सत्ता चालवायची असेल तर तुम्ही भाजप आरपीआय महायुतीसोबत या!


आठवले म्हणाले की, भविष्यात भाजप-शिवसेना-आरपीआय एकत्र आल्याशिवाय राहणार नाही. हे सरकार फार काळ टिकेल असे मला काही दिसत नाही. मंत्रीमंडळ विस्तारासाठी एक महिना लागला आता खातेवाटपासाठी किती महिने लागणार? हे पहावं लागणार आहे.


दरम्यान, आमचे (महाविकास आघाडीचे) पक्षांतर्गत खातेवाटप अगोदरच झाले असून येत्या दोन-तीन दिवसात जाहीर करु, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.


गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना-भाजप-आरपीआय मित्रपक्षांची युती आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत या युतीला महाराष्ट्राच्या जनतेने बहुमताचा कौल दिला. परंतु मुख्यमंत्रीपद आणि सत्तेच्या समसमान वाटपावरुन शिवसेना महायुतीमधून बाहेर पडली.


शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी करत राज्यात सत्तास्थापन केली आहे. परिणामी भारतीय जनता पक्ष आणि आरपीआयला सत्तेपासून दूर रहावे लागले आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांचे नेते सातत्याने शिवसेनेला लक्ष्य करत आहे. आज (30 डिसेंबर) आठवले यांनी शिवसेनेवर टीका केली, तसेच पुन्हा सोबत येण्याची साद घातली आहे.