मुंबई : मोठ्या प्रतीक्षेनंतर महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराचा शपथविधी सोहळा आज (30 डिसेंबर) विधीमंडळ परिसरात पार पडला झाला. एकूण 36 आमदारांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, जितेंद्र आव्हाड, अमित देशमुख, यशोमती ठाकूर, धनंजय मुंडे यांच्यासह 26 आमदारांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली. तर दहा आमदारांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.


यावेळी पहिल्यांदाच आमदार झालेल्या काही आमदारांनीदेखील मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी यंदा पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि निवडणूक जिंकलेदेखील. आज या तिघांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे.


महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळाची 13 वैशिष्ट्ये
1. एकाच घरात मुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्रीपद : शिवसेना पक्षप्रमुख आणि महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार पाहात आहेत. आज त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतली.


2. पहिल्यांदा आमदार आणि थेट मंत्री झालेले नेते : शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे आणि राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे हे तिघेजण पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. तिघांनाही महाविकास आघाडीमध्ये मंत्रीपद मिळालं आहे.


3. मंत्रीमंडळात दोन माजी मुख्यमंत्र्यांची मुलं : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत शंकरराव चव्हाण यांचे पुत्र अशोक चव्हाण आणि माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचे पुत्र अमित देशमुख या दोघांनी आज मंत्रीपदांची शपथ घेतली. विशेष म्हणजे अशोक चव्हाण यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपददेखील भूषवले आहे.


4. मंत्रीमंडळात केवळ तीन महिला आमदार, शिवसेनेकडून एकही नाही : काँग्रेसकडून वर्षा गायकवाड आणि यशोमती ठाकूर यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलं आहे. तर राष्ट्रवादीच्या आमदार अदिती तटकरे यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेकडून एकाही महिला आमदाराला मंत्रीपद देण्यात आलेले नाही.


5. दोन नेत्यांना शिवसेना भाजप सरकार (2014) आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रीपदं : शिवसेना नेते सुभाष देसाई आणि आमदार एकनाथ शिंदे हे दोन नेते 2014 च्या युती सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. हे दोन नेते महाविकास आघाडीमध्येदेखील मंत्री आहेत.


6. 40 दिवसात दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी अवघ्या 40 दिवसात दोन वेळा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 23 नोव्हेंबर भारतीय जनता पक्षाने राज्यात सत्तास्थापन केली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. परंतु हे सरकार केवळ तीनच दिवस टिकू शकलं. अजित पवारांनी आज पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.


7. सर्वाधिक काळ बिनखात्याचे मंत्री असलेले मंत्रींडळ : 28 नोव्हेंबर रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सहा नेत्यांनी मंत्रीपदांची शपथ घेतली होती. त्यानंतर 15 डिसेंबर रोजी सात मंत्र्यांमध्ये खातेवाटप झाले. दरम्यान 17 दिवस हे महाविकास आघाडीचे सात मंत्री हे बिनखात्याचे मंत्री होते.


8. 32 दिवस मंत्रीमंडळ विस्तार न झालेले मंत्रीडळ : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सहा नेत्यांनी 28 नोव्हेंबर रोजी मंत्रीपदांची शपथ घेतली होती. त्यानंतर तब्बल एक महिना दोन दिवसांनी (32 दिवसांनी) आज (30 डिसेंबर) मंत्रीमंडळाचा विस्तार झाला.


9. कोणत्या जिल्ह्याला सर्वाधिक मंत्रीपदं : महाविकास आघाडीच्या मंत्रींडळात मुंबईतल्या 6 नेत्यांना, कोल्हापूरच्या 3, पुणे 3 आणि अहमदनगरच्या 3 आमदारांना स्थान देण्यात आले आहे.


10. 36 पैकी 13 जिल्ह्यांना एकही मंत्रीपद नाही : सोलापूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, परभणी, उस्मानाबाद, धुळे, हिंगोली, वाशिम, अकोला, वर्धा आणि पालघर


11. उस्मानाबादचे तीन जावई मंत्रीमडळात : महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळात उस्मानाबादच्या एकाही आमदाराला संधी मिळाली नाही. मात्र उस्मानाबादचे तीन जावई मंत्रीमंडळात आहेत. उस्मानाबादमधील तेर हे गाव उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचे माहेर आहे. राष्ट्रवादीचे मंत्री राजेश टोपे हे उस्मानाबादच्या उपळा या गावचे जावई आहेत. उस्मानाबादमधील ढोकी हे गाव राष्ट्रवादीचे मंत्री प्राजक्त तनपुरे यांची सासरवाडी आहे. त्यामुळे उस्मानाबादच्या तीन जावयांना मंत्रीमंडळात स्थान मिळाल्याचा उस्मानाबादकरांना आनंदत आहे.


12. यापूर्वी मंत्रीपद भूषवणाऱ्यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मंत्रीपदाची माळ :


शिवसेना : एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, संजय राठोड, अब्दुल सत्तार, दादा भुसे


काँग्रेस : बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नितीन राऊत


राष्ट्रवादी : अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ, राजेश टोपे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड


13. एकाच मंत्रीमंडळात मामा भाचे : राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे हे दोघे मामा-भाचे आहेत. या दोघांचाही मंत्रीमंडळात समावेश करण्यात आला आहे.


मंत्र्यांची यादी 


शिवसेनेचे मंत्री

आदित्य ठाकरे (मुंबई)
अनिल परब (मुंबई)
उदय सामंत (रत्नागिरी)
गुलाबराव पाटील (जळगाव)
दादा भुसे (मालेगाव, नाशिक)
संजय राठोड (दिग्रस, यवतमाळ)
संदीपान भुमरे (पैठण, औरंगाबाद)
शंकरराव गडाख , नेवासाचे अपक्ष आमदार (नेवासा, अहमदनगर)
अब्दुल सत्तार (राज्यमंत्री) (सिल्लोड, औरंगाबाद)
राजेंद्र पाटील यड्रावकर, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (शिरोळ, कोल्हापूर)
शंभूराज देसाई (राज्यमंत्री) (पाटण, सातारा)
बच्चू कडू, अपक्ष आमदार (राज्यमंत्री) (अचलपूर, अमरावती)

काँग्रेसचे मंत्री

के.सी.पाडवी (धुळे) (अक्कलकुवा, नंदुरबार)
अशोक चव्हाण (नांदेड)
अमित देशमुख (लातूर)
यशोमती ठाकूर (अमरावती)
विजय वड्डेटीवार (चंद्रपूर)
सुनील केदार (नागपूर)
अस्लम शेख (मुंबई)
वर्षा गायकवाड (मुंबई)
सतेज पाटील (राज्यमंत्री) (कोल्हापूर)
विश्वजित कदम (राज्यमंत्री) (सांगली)

राष्ट्रवादीचे मंत्री

अजित पवार (उपमुख्यमंत्री) (बारामती, पुणे)
दिलीप वळसे पाटील (आंबेगाव, पुणे)
धनंजय मुंडे (परळी, बीड)
अनिल देशमुख (नागपूर)
डॉ. राजेंद्र शिंगणे (सिंदखे़ड राजा, बुलडाणा)
हसन मुश्रीफ (कागल, कोल्हापूर)
जितेंद्र आव्हाड (ठाणे)
नवाब मलिक (मुंबई)
बाळासाहेब पाटील (कराड, सातारा)
राजेश टोपे (अंबड, जालना)
प्राजक्त तनपुरे (राज्यमंत्री) (अहमदनगर)
दत्ता भरणे (राज्यमंत्री) (इंदापूर)
अदिती तटकरे (राज्यमंत्री) (रायगड)
संजय बनसोडे (राज्यमंत्री) (उदगीर, लातूर)

 मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे शपथ घेतो की... | ABP Majha