मुंबई : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर केंद्रात रामदास आठवले यांना एक कॅबिनेट मंत्रीपद आणि एक राज्यमंत्री पद देण्यात यावे अशी आक्रमक भूमिका रिपाइंच्या कार्यकर्त्यानी घेतली आहे. रामदास आठवले यांनी मोदींना कायम साथ दिली असून, आतापर्यंत रिपाईला एकच राज्यमंत्री पद देण्यात आले आहे. त्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले असून, महाराष्ट्रातही त्यांनी अशी मागणी लावून धरली आहे. मंत्रिपदासाठी अनेक कार्यकर्ते इच्छुक असून सुरेश बारसिंग यांचे नाव आघाडीवर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून केंद्रात सरकार आहे. 2014 पासून झालेल्या प्रत्येक निवडणुकीत रिपब्लिकन पक्ष हा भाजपसोबत आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची समाजकल्याण राज्यमंत्रीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र 2014 आणि 2024 या दोन्ही टर्ममध्ये त्यांना राज्यमंत्रिपदाचा भार सोपविण्यात आला आहे.
एनडीएचा घटक पक्ष असलेला रिपाइंला केंद्रात कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्रीपद मिळावे अशी रिपाइंच्या कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना राज्यमंत्रीपदावरून कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावे तसेच रिपाइंचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग यांना केंद्रात राज्यमंत्रीपदावर नियुक्ती करावी अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
महाराष्ट्रात रिपाइंला एक मंत्रीपद, महामंडळ अध्यक्षपद मिळावे
राज्यातील जनतेने महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी केले आहे. त्यामुळे महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. रिपब्लिकन पक्ष हा महायुतीचा घटक पक्ष असल्याने महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्री पद द्यावे तसेच 4 महामंडळाचे अध्यक्ष पदे,उपाध्यक्ष पदे व विधान परिषद सदस्यत्व द्यावे अशी आग्रही मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रिय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली आहे.
महाराष्ट्रात महायुतीचा महाविजय करण्यात सर्वच घटक पक्षाचा सिंहाचा वाटा आहे. देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वात भाजपचे 132 जण निवडून आले आहेत. त्यामुळे राज्यात भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पद देण्याची मागणी होत आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला आहे.
भाजपकडे आमदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळे भाजपचे केंद्रीय नेते काय निर्णय घेतात त्यावर पुढील वाटचाल आहे. मात्र महायुती सरकार मध्ये रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रीपद निश्चित द्यावे. एक विधानपरिषद सदस्यत्व द्यावे. 2 महामंडळाचे अध्यक्षपदे, 2 उपाध्यक्ष पदे आणि काही कार्यकर्त्यांना महामंडळाची संचालक पदे देण्याची मागणी आठवले यांनी केली आहे.
ही बातमी वाचा :