Maharashtra CM मुंबई: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर (Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024) राज्यात सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आला आहे. आज एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्याकडे सुपुर्द केला. मुख्यमंत्रिपद भाजपला जाणार असल्याची माहिती सूत्रांच्या हवाल्यानं समोर आलं आहे. यासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं नाव पुढे करण्यात येत आहे. भाजपचे नेते मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी आग्रही असताना शिवसेना पुन्हा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी करत आहे.
मुख्यमंत्रिपदाचा निर्णय दिल्लीत होण्याची शक्यता आहे, मात्र त्याआधीच दोन्ही बाजूकडून दबाव निर्माण केला जात आहे. राज्यात भाजपने 132 जागा जिंकल्या आहेत. याशिवाय छोट्या पक्षांतील 5 आमदार आणि अपक्षांनीही भाजपला पाठिंबा दिला आहे. यामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे रत्नाकर गुट्टे, जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे व अशोक माने, युवा स्वाभिमानी पक्षाचे रवी राणा, अपक्ष शिवाजी पाटील या आमदारांचा समावेश आहे. या अपक्षांच्या पाठिंब्याने भाजपचे विधानसभेतील संख्याबळ 137 वर पोहोचले असून त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुढे करण्यात येत आहे.
देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे होणार? ( How will Devendra Fadnavis become the CM of Maharashtra )
देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्यासाठी भाजप पक्षाची संयुक्त बैठक बोलावावी लागणार आहे. या बैठकीत भाजपच्या सर्व मित्रपक्षांच्या आमदारांना देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला मंजुरी द्यावी लागणार आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे पत्र राज्यपालांना द्यावे लागणार आहे. त्यानंतरच देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा होईल.
मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर शिंदे गटाचा दावा का?
एकीकडे भाजप देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा आग्रह धरत असले तरी दुसरीकडे शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नावावर ठाम आहे. महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणूक लढवली होती. लोकसभेत महायुतीला मोठा फटका बसला होता. परंतु विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीने चांगलीच बाजी मारली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला विधानसभेत मोठे यश मिळाले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा देखील महायुतीला फायदा झाल्याचं दिसून आले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने 57 जागा जिंकल्या. तर जुन्नरचे अपक्ष आमदार शरद सोनवणे आणि शिरोळमधून निवडून आलेले राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे विधानसभेत शिवसेनेचे संख्याबळ 59 झाले आहे आणि त्यामुळेच मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना शिंदे गटाकडून एकनाथ शिंदे यांच्या नावाचा आग्रह धरत आहे.