सोलापूर: माढा लोकसभा मतदारसंघातील  (Madha Lok Sabha Election) मोहिते-पाटील आणि खासदार रणजित निंबाळकर यांच्या वादावर तोडगा काढायला आलेले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) अपयशी ठरल्याचं चित्र आहे. बावनकुळे यांची पाठ फिरताच खासदार निंबाळकर  (Ranjit Nimbalkar) यांचे फलटण येथील कट्टर विरोधक आणि विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर (Ramraje Nimbalkar) यांनी विजयसिंह मोहिते पाटील  (Vijaysingh Mohite Patil) यांच्या निवासस्थानी जाऊन सदिच्छा भेट घेतली. त्यामुळे मोहिते-निंबाळकर वाद अजून चिघळत जाणार असल्याचं चित्र आहे.


गुरूवारी रात्री विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे निंबाळकर, संजीवराजे निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांच्या अकलूज येथील शिवरत्न बंगला येथे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळेस मोहिते-पाटील परिवाराच्या वतीने रामराजे आणि संजीवराजे निंबाळकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी आमदार प्रभाकर घार्गे, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हाईस चेअरमन अनिल देसाई, सोलापूर भाजपचे नेते धैर्यशिल मोहिते-पाटील, अर्जुनसिंह मोहिते-पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. 


सदिच्छा भेट नाही तर लोकसभेची तयारी 


रामराजे निंबाळकर आणि मोहिते पाटलांची ही भेट वरवर सदिच्छा भेट वाटत असली तरी माढा लोकसभा उमेदवारीसाठी विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांना टक्कर देण्याची मोहिते पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली असल्याचं स्पष्ट दिसतंय. 


सोलापूर जिल्ह्यातील मोहिते पाटील यांचे कट्टर विरोधक अशी ओळख असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माढा आमदार बबनदादा शिंदे, करमाळा आमदार संजयामामा शिंदे, सांगोला शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आणि माण खटावचे भाजप आमदार जयकुमार गोरे हे खासदार रणजित निंबाळकर यांच्या मागे उभे आहेत. माळशिरस तालुक्यातील मोहिते विरोधक आणि राष्ट्रवादीचे उत्तम जानकर हे देखील विद्यमान खासदार रणजित निंबाळकर यांच्या मागे उभे आहेत.


हाच विरोधाचा धागा पकडत खासदार निंबाळकर यांचे फलटण येथील कट्टर विरोधक रामराजे आणि संजीवराजे निंबाळकर यांनी मोहिते पाटील यांची घेतलेली भेट हा निंबाळकर यांच्यासाठी इशारा मानाला जात आहे. रामराजे निंबाळकर हे अजित पवार गटात असले तरी त्यांचा आणि खासदार रणजित निंबाळकर यांच्यातील वाद जुना आहे.


माढा लोकसभा मतदारसंघातील सर्व शक्तिशाली नेते भाजप, अजित पवार राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाकडे असूनही भाजपातील पक्षांतर्गत वाद महायुतीची धोक्याची घंटा ठरण्याची भीती आहे. अजित पवार यांच्यासोबत आलेले नेते रामराजे निंबाळकर हे आपले जुने वैर विसरून पक्षादेश पाळणार का हेही भविष्यात दिसणार आहे.


भाजपने मोहिते आणि निंबाळकर यांच्यातील वादावर वेळीच तोडगा काढला नाही तर संघर्षाची ही लाट संपूर्ण लोकसभा मतदारसंघात पसरण्याची भीती आहे. याचाच फायदा उठवण्यासाठी शरद पवार यांची राष्ट्रवादी नजर ठेवून असून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजप संघर्षाचा फायदा उठवण्याच्या तयारीत आहेत. 


सध्या राष्ट्रवादीकडे माढा लोकसभेसाठी तगडा उमेदवार नसल्याने इंडिया आघाडीदेखील मोहिते पाटील किंवा संजीवबाबा निंबाळकर यांना गळाला लावण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मोहिते पाटील आणि रामराजे निंबाळकर यांची सदिच्छा भेट भाजपचे ठोके वाढवणारी ठरणार आहे.


ही बातमी वाचा: