मुंबई: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) हे उमेदवार असण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपतींना उद्या दुपारी 12 वाजता वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांनी बोलावल्याची माहिती समोर येत आहे. याच वेळी संभाजीराजे शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यताही आहे.

Continues below advertisement


उद्या दुपारी 12 वाजता संभाजीराजे छत्रपती यांनी अधिकृत पक्षप्रवेश करावं, त्यानंतर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात येईल असा निरोप शिवसेनेच्या वतीनं संभाजीराजेंना देण्यात आल्याचं सांगितलं जातय. शिवसनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजेंसोबत फोनवरुन चर्चा केली आहे. पण संभाजीराजेंनी याला अद्याप मान्यता दिली नाही. त्यांनी एक दिवसाची वेळ मागितली आहे. पण संभाजीराजे शिवसेनेची ही ऑफर स्वीकारतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.


संभाजीराजे आता यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वच पक्षांचं लक्ष लागलं आहे. 


 राज्यसभेच्या सहा जागांसाठी 10 जूनला निवडणूक होणार आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेची उमेदवारी स्विकारुन निवडणूक लढवावी, असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी म्हटलं होतं. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना संभाजीराजे छत्रपतींना राज्यसभेसाठी उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. यातच आता संभाजीराजे छत्रपती शिवसेना पुरुस्कृत उमेदवार असतील अशी माहिती समोर आली आहे. 


सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादीचा शिवसेनेला पाठिंबा
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा हा शिवसेनेला असेल, मग शिवसेनेचे उमेदवार संभाजीराजे असो वा अन्य कुणीही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले की, "राष्ट्रवादीचा एक उमेदवार राज्यसभेसाठी निवडून येऊ शकतो. उरलेली शिल्लक मतं ही आम्ही शिवसेनेला देणार आहोत. दोन वर्षांपूर्वी झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत आम्ही शिवसेनेकडून राज्यसभेची दुसरी जागा मागितली होती. त्यावेळी शिवसेनेने आम्हाला सहकार्य केलं. पुढच्या वेळी राष्ट्रवादीने आपल्याला सहकार्य करावं अशी मागणी त्यावेळी शिवसेनेने केली होती. त्यामुळेच यावेळी आम्ही शिवसेनेला मदत करण्याची भूमिका घेतली. आता शिवसेनेचा सहाव्या जागेसाठी उमेदवार हे संभाजीराजे असो वा अन्य कुणीही, राष्ट्रवादी त्यांना मदत करेल आणि तो उमेदवार निवडून येईल."