Sharad Pawar :  कोरोना काळात पंतप्रधानांनी सर्वांना घरी राहायची विनंती केली, पण मला हे पटलं नाही. मी राज्यभर दौरे केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. मात्र, कोरोनाच्या संकाटात तुमचे घटक अहोरात्र सेवेत होते. या काळात तुम्ही जीवाची पर्वा न करता रुग्णांना सेवा दिली. त्याचवेळी दुर्दैवाने तुमच्यातील काही घटकांचा मृत्यू झाला. अशा परिस्थितीतही तुम्ही अखंडितपणे सेवा दिली. ज्याची नोंद अंतरराष्ट्रीय पातळीवर घ्यावी लागली, असेही पवार म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये आयोजीत करण्यात आलेल्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसियेशनच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते.


डॉक्टर आणि रुग्णांचा संवाद कसा यावर सेवा अवलंबून


वैद्यकीय क्षेत्रात अनेकांनी मोठं योगदान दिलं आहे. साने गुरुजींच्या विचाराने दादा गुजरांनी कार्य सुरु केलं, त्यातून या संघटनेचा उगम झाला. आज ही संघटना देशातील महत्वाची संघटना मानली जात असल्याचे शरद पवार म्हणाले. आज लोकांच्या मनात डॉकटरांबाबत प्रश्न उभा आहे. पण माझा स्वतःचा अनुभव वेगळा आहे. डॉक्टर आणि रुग्णांचा संवाद कसा आहे, यावर उपचार आणि सेवा अवलंबून असते. त्यामुळं तुमचा विश्वास प्रस्थापित व्हायला हवा. यासाठी पवारांनी काही उदाहरणं देखील दिली. प्रश्न जर राज्यव्यापी असेल तेव्हा माझ्याशी संपर्क साधला जातो. त्यात तुमचीही संघटना आली. आता तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारशी मी बोलेन असे पवार म्हणाले. या संघटनेचं आणखी वैशिष्ट्य आहे की, तुम्ही समाजिक योगदान देता. रक्तदान शिबिराचं मोठं आयोजन तुम्ही केलं होतं, ज्याची नोंद गिनीज बुकमध्येही झाली होती. असे विक्रम तुम्ही करत असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.


आता आषाढी वारी आली आहे. वारकरी पायी जातात. ऊन, वारा, पाऊस अशी परिस्थिती उद्भवते. तेव्हा कधी कधी रोगराई पसरते. तेव्हा तुम्ही मदतीला धावतात. पूर परिस्थिती निर्माण झालेल्या संकटात तुम्ही पुढे सरसावले हे मी पाहिलं होत. ही तुमची कामगिरी लोकांमध्ये तुमच्याप्रती विश्वास निर्माण करत आहे, यात शंका नाही, असेही शरद पवार यावेळी म्हणाले.