समोरून झालेले तलवारीचे घाव भरून निघतात, पण घरच्या कट्यारीचे घाव जिव्हारी लागतात, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे. चळवळ संपवण्याचा अनेकदा प्रयत्न झाला, पण आम्ही रक्त सांडून चळवळ उभा केलीय, कुणाचा मायावी प्रयत्नाने संपणार नाही, असं देखील शेट्टी यांनी फेसबुक पोस्टद्वारे म्हटलं आहे.
राजू शेट्टी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, आजपर्यंत मी अनेक प्रसंगांना सामोरा गेलो, अनेकांचे वार झेलले पण, इतका जखमी कधीच झालो नव्हतो. समोरुन झालेले तलवारीचे घाव कधीतरी भरुन येतात, पण घरच्या कटारीचे भाव जिव्हारी लागतात. स्वाभिमानी हा एक परिवार आहे. रक्ताच्या नात्यापेक्षा इथलं नातं घट्ट आहे. एका विधानपरिषदेच्या जागेमुळे जर नात्यात अंतर पडत असेल तर ही ब्याद आम्हाला नकोच, असं त्यांनी म्हटलं.
शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्याचं सभागृह हे एक साधन आहे, अंतिम साध्य नव्हे. तेव्हा विधानपरिषदेच्या जागेवरुन कार्यकर्त्यांमध्ये गैरसमज पसरवणं, मन दुरावणं योग्य नाही. स्वाभिमानी संपावी म्हणून अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत, त्यांना ही पर्वणी वाटते, पण आम्ही रक्त सांडून ही चळवळ उभी केली आहे. कोणाच्या मायावी प्रयत्नाने ती संपणार नाही. कार्यकर्त्यांनी संयम बाळगावा, जे सच्चे स्वाभिमानी असतील त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त होऊन एकमेकांना जखमी करु नये. मन जुळण्यासाठी काही वर्षे लागतात, मनभेद होण्यासाठी एक क्षण पुरेसा असतो. दीर्घकाळच्या मैत्रीत दुरावा निर्माण करुन एकमेकाबद्दल अविश्वास निर्माण करणारी विधानपरिषद ही ब्यादच आपल्याला नको असे वाटते. याबाबतीत कोणीही माझ्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करु नये, असंही त्यांनी म्हटलंय.
शेट्टी आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, राज्यपालांच्या कोट्यातून ज्या बारा जागा विधानपरिषदेवर सरकारमार्फत शिफारस करुन पाठवायच्या आहेत. त्यापैकी एका जागेवर स्वाभिमानीने सुचवलेला उमेदवार द्यावा, असा प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांकडून आला होता. राज्यपालांचा नियम आणि निकष याबाबतचा आग्रह लक्षात घेता राज्य व राष्ट्रीय पातळीवरील शेतकरी चळवळीतील सहभाग लक्षात घेऊन मी स्वत: जर उमेदवारी स्वीकारली तर आक्षेपाला जागा राहणार नाही, असे आघाडीच्या नेत्यांचे मत होते. आम्ही विचार करुन कळवतो असा उलटा निरोप मी त्यांना दिला व पक्षाचे सरचिटणीस डॉ. अक्कोळे यांना राजकीय व्यवहार समितीची बैठक बोलवण्यास सांगितले. जिल्ह्यातील सदस्यांनी प्रत्यक्ष जमावे आणि इतर सदस्यांशी फोनवरुन चर्चा करावी असे सुचवले. 12 जून रोजी डॉ. अक्कोळे यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली, या बैठकीस राजकीय व्यवहार समितीचे प्रमुख सावकर मादनाईक, पक्षाचे अध्यक्ष जालंधर पाटील यांच्या सहित जिल्ह्यातील सर्व सदस्य उपस्थित होते व इतर सर्व सदस्यांशी फोनवरुन चर्चा करुन त्यांचे मत आजमावले गेले आणि एक मताने आघाडीचा प्रस्ताव स्वीकारण्याचे ठरले. माझ्या नावाबाबत चर्चा होणार होती, म्हणून पदाधिकाऱ्यांना मोकळेपणाने चर्चा करता यावी या उद्देशाने मी जाणिवपूर्वक या बैठकीला गैरहजर राहिलो. तरीही सर्व पदाधिकाऱ्यांनी माझ्या नावाबाबत एकमत केले व तसा आघाडीच्या नेत्यांना निरोप पाठवण्यास सांगितले. तो निरोप घेऊन मी 16 जून रोजी आघाडीचे नेते शरद पवार साहेब यांना पक्षाचे सचिव डॉ.महावीर अक्कोळे यांच्यासह भेटलो व होकार कळवला. आता काही पदाधिकारी माझ्या हेतूबद्दलच शंका घेत आहेत, हे अत्यंत क्लेषकारक आहे. गेल्या पंचवीस वर्षामध्ये पहिल्यांदाच असे घडलेले आहे, असं शेट्टी यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा - राजू शेट्टी यांना राष्ट्रवादीकडून विधानपरिषदेच्या आमदारकीची ऑफर
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त जागांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना नुकतीच ऑफर देण्यात आली होती. यासंदर्भात शेट्टी यांनी शरद पवार यांची भेट देखील घेतली होती.
BLOG | पुन्हा एकदा शेतकरी चळवळीची पांगापांग!