कोल्हापूर : विधान परिषदेत नियुक्ती करण्यासाठी देण्यात आलेल्या 12 आमदारांच्या यादीबाबत अद्यापही राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी निर्णय घेतलेला नाही. अशातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे नाव यातून वगळल्याची चर्चा होती. यावरुन राजू शेट्टी आणि रविकांत तुपकर यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. एकूणच प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मौन सोडले असून या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केलं. यानंतर आता पुन्हा राजू शेट्टी यांनी पवारांच्या स्पष्टीकरणानंतर प्रतिक्रिया दिलीय.


राजू शेट्टी काय म्हणाले?
आमदारकी या विषयावर मला काहीच बोलायचं नाही. या सगळ्या बातम्या कुणी पेरल्या? कशासाठी पेरल्या याची मला माहिती आहे. ज्या तत्परतेने शरद पवार यांनी खुलासा केला. त्या तत्परतेने शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बोलले असते तर अधिक आनंद झाला असता, असा टोला राजू शेट्टी यांनी पवारांना लगावला आहे. शरद पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख आहेत. महाविकास आघाडीने राज्यातील पूरग्रस्तांना बेदखल केलं आहे. शेतीचे पंचनामे होऊन दोन आठवडे झाले. अजून का निर्णय घेतला नाही? याच्यावर पवारांनी भाष्य करायला हवं होत, असे शेट्टी म्हणाले.


मी महाविकास आघाडीचा गुलाम नाही; पूरग्रस्तांना मदत देताना सरकार चुकलंय : राजू शेट्टी


दिलेला शब्द आम्ही पाळला : पवार
शरद पवार एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले होते. यावेळी शरद पवार यांना राजू शेट्टींच्या नावाबाबत प्रश्न विचारण्यात आला. ते नाराज असतील, तर त्याबाबत काही म्हणायचे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जी यादी राज्यपालांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्यावतीने दिली आहे, त्यात राजू शेट्टी यांचे नाव आहे. राजू शेट्टी यांनी सहकार आणि शेतीच्या क्षेत्रात जे योगदान दिले आहे, ते लक्षात घेऊन त्यांना विधान परिषदेवर घ्यावे, असा प्रस्ताव आम्ही दिलेला आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय राज्यपालांकडून आलेला नाही. एकदा आम्ही निर्णय घेतल्यानंतर याबाबतची अंतिम भूमिका ही राज्यपालांना घ्यायची असताना मला आश्चर्य वाटते की, अशा प्रकारची विधान कशी केली जातात. आम्ही आमचे काम प्रामाणिकपणाने केले आहे. राजू शेट्टींनी काय वक्तव्य केले त्यावर भाष्य करायचे नाही. दिलेला शब्द पाळला आहे. आता राज्यपाल काय करतात याची आम्ही वाट पाहतोय, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली आहे.


तत्पूर्वी, आमदारकी द्यावी की देऊ नये हा मुद्दा माझ्यासाठी गौण आहे. तो साधा समझोता आहे. राजकारणात असे समझोते होत असतात. राष्ट्रवादी आणि स्वाभिमानी शेतकरी पक्षात हा समझोता झाला होता. तो पाळायचा की, नाही पाळायचा की, पाठीत खंजीर खुपसायचा, कशा पद्धतीने पाळायचा हे ज्यांनी शब्द दिला त्याने ठरवायचे आहे. आम्ही त्यांच्या मागे आमदारकी द्या म्हणून कधी गेलो नव्हतो. ‘करेक्ट कार्यक्रमा’च्या पलीकडे आणखी एक करेक्ट कार्यक्रम असतो आणि तो मी करेन, असा इशारा राजू शेट्टी यांनी माध्यमांशी संवाद साधताना दिला होता.