मुंबई : ज्यांच्या हाती राज्याच्या प्रशासनाचं भवितव्य, त्यांनीच भ्रष्टाचार केल्याचं धक्कादायक वास्तव राज्यात घडलंय. शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराप्रकरणी पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम सुपेंच्या घरावर दुसऱ्यांदा धाड टाकली. त्यात पोलिसांनी जवळपास दोन कोटींचं घबाड जप्त केलंय. त्यानंतर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फजणवीस यांनी ट्वीट करत मुख्यमंत्र्यांकडे पेपरफुटीप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. लाखो विद्यार्थ्यांना वेठीस धरणार्या खर्या गुन्हेगारांचा शोध घ्यायचा असेल तर हे प्रकरण सीबीआयला सोपवा अशी विनंती देखील त्यांनी या वेळी केली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी तुकाराम सुपेकडे 88 लाख रुपये सापडल्यानंतर आज आणखी 2 कोटी रुपये रोख आणि सोने सापडले. म्हाडाच्या परीक्षेत गैरप्रकार करणार्या जीए सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजीला अभय यानेच तुकाराम सुपेंनी दिले. काळ्या यादीतील या कंपनीला त्यांनीच तीन महिन्यात बाहेर काढले. आता या जीए सॉफ्टवेअरचे संचालक डॉ. प्रीतिश देशमुखकडे पोलिस भरतीची ओळखपत्र सापडली आहेत. म्हणजे आरोग्य भरती, म्हाडा, टीईटी, पोलिस भरती हे सर्व घोटाळे एकाच माळेचे मणी दिसताहेत. या सर्व घोटाळ्यातील गुंतागुंत पाहता सीबीआय चौकशी व्हायलाच हवी. सीबीआय चौकशी झाली तरच या घोटाळ्यांमधील मंत्रालयातील धागेदोरे उघड होतील, अन्यथा वसुलीचे हे आणखी एक प्रकरण कधी उजेडात येणारच नाही.
सुपेंच्या घरातून 1 कोटी 58 लाखांची रोकड आणि सोन्याचे दागिने हस्तगत केल्याची माहिती मिळतेय. याआधी झालेल्या धाडीत पोलिसांनी 90 लाखांचं घबाड हस्तगत केलं होतं. पण पुन्हा पोलिसांचा छापा पडण्याच्या भीतीनं सुपेंच्या पत्नी आणि मेहुण्यानं रक्कम आणि दागिने दुसरीकडे लपवले. पण पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रोख रकमेसह ऐवज पोलिसांच्या हाती लागलाय. तुकाराम सुपे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत. लष्कर भरती, आरोग्य भरती, म्हाडा भरती आणि शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहाराचं रॅकेट आता हळूहळू उघड झालंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
संबंधित बातम्या
TET परीक्षा घोटाळा प्रकरण : दुसऱ्या धाडीतही तुकाराम सुपेंच्या घरी घबाड, दोन कोटींहून अधिक रक्कम जप्त
MHADA Paper Leak : महाराष्ट्र परीक्षा मंडळाचे अध्यक्ष तुकाराम सुपेच्या घरातून 88 लाखांची रोकड जप्त
Mhada Exam Paper : म्हाडा पेपर फुटीच्या चौकशीत धक्कादायक माहिती, वापरला खास Code Word