शिलॉंग : भारतीय न्यायव्यवस्थेमध्ये न्यायासाठी कुणाला किती वाट पहावी लागेल हे सांगता येत नाही. आजही अनेकांना त्यांच्या तारुण्यात दाखल करण्यात आलेल्या खटल्यांवर त्यांच्या मृत्यू पश्चात न्याय मिळाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेकांवर खटला दाखल नसूनही त्यांना तुरुंगात खितपत पडावं लागतंय. मेघालयामध्येही असाच एक प्रकार समोर आला आहे. दोन वर्षांपूर्वी मानवी तस्करीच्या  (Human Trafficking) आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या महिलेला दोन वर्षांपर्यंत तुरुंगात रहावं लागलं आहे. या काळात तिच्या खटल्यावर कोणतीही सुनावणी करण्यात आली नाही तसेच तिला जामीनही मिळाला नाही. अटक करण्यात आली त्यावेळी ती महिला गर्भवती होती. त्यामुळे तिला तुरुंगातच मुलाला जन्म द्यावा लागला. शेवटी सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत त्या महिलेला जामीन मंजूर केला आहे. 


मेघालयातील राहणारी द्रभामोन पहवा या महिलेला दोन वर्षांपूर्वी मानवी तस्करीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. 2020 सालापासून ती तुरुंगात खितपत पडली आहे. अटक करण्यात आली त्यावेळी द्रभामोन पहवा गर्भवती होती. तिने तिच्या मुलाला तुरुंगातच जन्म दिला. आतापर्यंत हे मुल तिच्यासोबत तुरुंगातच होतं. गेल्या दोन वर्षांपासून या खटल्यावर कोणतीही सुनावणी झाली नाही. शेवटी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. सरन्यायाधीश एनव्ही रमना यांच्या खंडपीठाने शेवटी या महिलेला जामीन मंजूर केला. 


या खटल्यावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे की, पक्षकारांच्या वकीलांचा युक्तीवाद ऐकल्यानंतर ही महिला गेल्या 18 महिन्यांपासून तुरुंगात असल्याचं स्पष्ट होतंय. या काळात तिने मुलाला जन्म दिला आणि याच आधारावर ती जामीनास पात्र आहे. 


नोकरी देण्याच्या आमिषाने वेश्या व्यवसायात ढकलले
या महिलेला दिल्लीमध्ये चांगली नोकरी देण्याचे आमिष देण्यात आलं आणि तिला फसवून वेश्या व्यवसायात ढकलण्यात आलं अशी माहिती या महिलेल्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात दिली.  


महत्त्वाच्या बातम्या :