अमरावती: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे एकमेव आमदार देवेंद्र भुयार यांची अखेर पक्षातून हकालपट्टी झाल्याची घोषणा संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केली आहे. अमरावती जिल्ह्यातील हिवरखेड येथे आयोजित मेळाव्यात त्यांच्या हकालपट्टीची घोषणा करण्यात आली आहे. 


अमरावतीच्या हिवरखेडमध्ये आज स्वाभिमानी संघटनेचा मेळावा होता. यामध्ये संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत सभा पार पडली. यामध्ये आमदार देवेंद्र भुयार यांच्या विरोधात फलक झळकले. 'आमदाराची हकालपट्टी झालीच पाहिजे', 'आम्ही शेतकऱ्यांनी केला निर्धार, आमदारांना आता आम्ही घरी बसवणार', "आमदार हटाव वरुड-मोर्शी बचाव" अशा मजकुराचे पोस्टर झळकत होते. 


यावेळी विदर्भ अध्यक्ष दामू अण्णा इंगोले यांनी संघटनेकडून आमदार देवेंद्र भुयार यांना संघटनेकडून हकालपट्टी करण्याचा प्रस्ताव दिला. हा प्रस्ताव पार करण्यात आला आणि आमदार देवेंद्र भुयार यांची हकालपट्टी झाल्याचं जाहीर करण्यात आलं. आजच्या शेतकरी मेळाव्याला मोठ्या संख्येने शेतकरी तसेच स्वाभिमानीचे कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावल्याचं चित्र होतं.


काय म्हणाले होते राजू शेट्टी?
अमरावती जिल्ह्यातील वरूड मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांच्या संदर्भात कार्यकर्त्यांच्या काय भावना आहे हे जाणून घेऊन त्यांच्याबद्दलचा निर्णय घेऊ. ते पक्षासाठी सक्रिय नाही अशी कार्यकर्त्यांच्या भावना असून त्यांची भूमिका जाणून घेऊ असं राजू शेट्टी म्हणाले होते. आमदार भुयारबद्दल त्यांच्या काय तक्रारी आहेत हे जाणून घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असंही शेट्टी म्हणाले होते.


दरम्यान, मला विश्वासात घेतलं तर आपण स्वाभिमानी सोबत असू, नाही घेतलं तर त्यांच्या शिवाय असा इशारा आमदार देवेंद्र भुयार यांनी दिला होता. आता त्यांची हकालपट्टी झाल्यानंतर ते काय भूमिका घेणार याची उत्सुकता सर्वांना आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह -


ABP Majha