पुणे : सदाभाऊ खोत यांच्याबाबत कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या. त्यामुळे या तक्रारींबाबत सदाभाऊंनी 4 जुलैपर्यंत बाजू मांडावी, असा अल्टिमेटम स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.
“पक्षविरोधी भूमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार आहे. अनेक पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविरोधात तक्रारी केल्या. या तक्रारींची शहानिशा करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. या समितीसमोर 4 जुलैपर्यंत सदाभाऊंनी आपली बाजू मांडावी. त्यानंतर सदाभाऊंबाबत निर्णय घेतला जाईल.”, असे राजू शेट्टी म्हणाले.
“सदाभाऊ खोत यांची भूमिका इथून पुढे ‘स्वाभिमानी’ची अधिकृत मानली जाणार नाही. प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे हेच स्वाभिमानीची अधिकृत भूमिका मांडतील.”, असेही राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
सरकारमध्ये राहण्याबाबत 25 जुलैनंतर निर्णय
“सरकारसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही अजूनही तयार आहोत. 25 जुलैपर्यंत सरकारने चर्चेसाठी वेळ द्यावी. मात्र, त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटना थांबणार नाही. सरकारला वाकवून स्वाभिमानी आपल्या मागण्या मान्य करून घेईल.”, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.
मध्य प्रदेशातून 6 जुलैपासून किसान मुक्ती यात्र
“मध्य प्रदेशातील मंदसौरपासून सहा जुलैला किसान मुक्ती यात्रेची सुरुवात होईल. या यात्रेत देशभरातील 130 हून अधिक शेतकरी संघटना सहभागी होतील. 18 जुलैला ही यात्रा दिल्लीत पोहचेल. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, अशा मागण्या या यात्रेत असतील.”, अशी माहितीही खासदार राजू शेट्टी यांनी दिली.
...मग शेतकऱ्यांमध्ये एवढा असंतोष का? : राजू शेट्टी
“सरकारने जाहीर केलेली कर्जमाफीची आकडेवारी संशयास्पद आहे, हे आम्ही घेतलेल्या आढाव्यावरुन ध्यानात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत केलेल्या दाव्यानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणात जर शेतकऱ्यांना लाभ होत असेल, तर शेतकऱ्यांमध्ये एवढा असंतोष का?”, असा सवाल खासदार राजू शेट्टी यांनी विचारला.