Rajesh Tope : मागील काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. राज्यात तिसरी लाट ओसरल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मुंबई, पुणे आणि ठाण्यासारख्या शहरातील कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. याच आधारावर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात तिसरी लाट संपेल असे सांगितले आहे. जालन्यातील एका कार्यक्रमाला शुक्रवारी राजेश टोपे उपस्थित होते, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना राजेश टोपे म्हणाले की, 'दोन दिवसाखाली राज्यातील कोरोना परिस्थितीवर मंत्रीमंडळाची आढावा बैठक झाली. गेल्या काही दिवसात राज्यातील कोरोना आकडेवारीमध्ये मोठी घट पाहायला मिळत आहे. राज्यात 48 हजार दैनंदिन रुग्णसंख्या आढळणारी आता दहा ते 15 हजारांवर आली आहे. ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या आढळत होती, तिथेही रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. मुंबई, पुणे, ठाणे आणि रायगड यासारख्या जिल्ह्यात कोरोना रुग्ण कमी झाले आहेत. मुंबईसारख्या मोठ्या शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या पाचशे-सहाशेवर आली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांचा ग्राफ कमी होत आहे. त्यामुळे असे वाटतेय की, मार्च महिन्यापर्यंत आपण राज्यातील कोरोनाची तिसरी लाट ओसरेल, असे वाटतेय. ज्याठिकाणी कोरोना रुग्णसंख्या वाढली नव्हती, त्याठिकाणी कोरोना रुग्णांची संख्या वाढेल अन् कमीही होईल. '
सध्याच्या परिस्थितीत कोणतेही निर्बंध वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार नाही. शासनाचा कल निर्बंध कमी करण्याकडे आहे. दर आठवड्याला निर्बध टप्प्या टप्याने कमी झालेले पाहायला मिळतील. राज्यात लावण्यात आलेल्या सर्व निर्बंधावर बैठकीत चर्चा झाली. काही ठिकाणी निर्बंध कमीही केले आहेत. यापुढेही टप्याटप्याने निर्बंध कमी केले जातील. तज्ञांच्या माहितीनुसार तिसरी लाट मार्च महिन्याच्या मध्यात संपुष्टात येणार आहे, त्यामुळे शासनाचा कल निर्बध कमी करण्याकडे असेल असेही टोपे यावेळी म्हणाले.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live