Coronavirus Variant South Africa  : दक्षिण आफ्रिकेतील नव्यानेच सापडलेल्या कोरोनाच्या नवीन व्हेरिएंट हा सर्वात घातक असून या व्हेरिएंटमुळे अनेक मृत्यू होत असल्याची माहिती काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या आरोग्य विभागाकडून व राज्याच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या प्रेझेन्टेशन द्वारे सांगण्यात आलंय , त्यामुळे यापुढे राज्यात आता मोठी सावधगिरी बाळगणे महत्वाचं असल्याचा इशारा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांनी दिला आहे. नवीन व्हेरिएंट आल्याची चर्चा असताना राज्य सरकार कडून काय तयारी करण्यात आली आहे? या प्रश्नावर ते बोलत होते. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी डिसेंबरमध्ये तिसरी लाट येईल, त्याचा प्रभाव कमी असेल मात्र काळझी घ्यावी लागेल असं वक्तव्य केलं होतं. त्यातच दक्षिण आफ्रिकामध्ये आढळलेल्या नव्या कोरोना व्हेरिएंटमुळे चिंतेत भर पडली आहे. आतापर्यंतचा सर्वात धोकादायक वेरिएंट असल्याचं बोललं जात आहे. या व्हेरिएंटविरोधात लढण्याची राज्याने काही तयारी केली आहे का? असा प्रश्न विचारला असता शिंगणे म्हणाले की, ‘दक्षिण आफ्रिकेतील सापडलेल्या नवीन व्हेरिएंट इतर व्हेरिएंटच्या तुलनेत घातक आहे. या व्हेरिएंटमुळे अनेक मृत्यू होत असल्याची माहिती मिळाली आहे. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याच्या आरोग्य विभागाकडून व राज्याच्या प्रधान सचिवांनी दिलेल्या प्रेझेन्टेशन द्वारे या व्हेरिएंटबद्दल सविस्तर माहिती मिळाली. यापुढे राज्यात आता मोठी सावधगिरी बाळगणे महत्वाचं आहे.’


आफ्रिकेत आढळलेला 'बोत्सवाना  व्हेरिएंट' बाबत शास्त्रज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. शास्त्रज्ञांनी जगाला सतर्कतेचा इशारा दिला आहे. या  व्हेरिएंटनंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. कोरोनाच्या नव्या वेरिएंटचे नाव B.1.1.529 आहे. याला 'बोत्सवाना  व्हेरिएंट'ही म्हटले जाते. आफ्रिकन खंडातील देश बोत्सवानामध्ये हा वेरिएंट आढळला.  दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय सार्वजनिक आरोग्य संस्था नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर कम्युनिकेबल डिजीजने या वेरिएंटला दुजोरा दिला आहे. बी.1.1.529 वेरिएंटचा संसर्ग एका रुग्णाद्वारे फैलावला असल्याचे म्हटले जात आहे. लंडन येथील युसीएल जेनेटिक्स इन्स्टिट्यूटचे संचालक फ्रॅक्वा बेलॉस यांनी म्हटले की, हा  व्हेरिएंट एखाद्या गंभीर आजाराशी दोन हात करणाऱ्या रुग्णापासून तयार झाला आहे. या रुग्णाला एचआयव्ही/एड्स असण्याची शक्यता आहे. 


हा व्हेरिएंट इतका धोकादायक का?
1.1.529 या प्रकारात 50 हून अधिक उत्परिवर्तन (म्युटेशन) सापडले आहेत, त्यापैकी 32 उत्परिवर्तन त्याच्या स्पाइक प्रोटीनमध्ये आहेत. शरीरातील पेशींमध्ये प्रवेश करण्यासाठी विषाणू स्पाइक प्रोटीनची मदत घेतो. याव्यतिरिक्त, व्हेरिएंटच्या रिसेप्टर बाइंडिंग डोमेनमध्ये 10 उत्परिवर्तन झाले. डेल्टा व्हेरियंटमध्ये असे फक्त दोन उत्परिवर्तन होते. जेव्हा डेल्टा व्हेरियंटने स्पाइक प्रोटीनमध्ये K417N उत्परिवर्तन केले तेव्हा डेल्टा प्लस प्रकाराचा जन्म झाला. या वेरिएंटने शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीची मोठ्या प्रमाणावर हानी केली होती. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या वाढली.

कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्यांना किती धोका?
जगभरात विकसित झालेल्या बहुतेक कोविड लसींचा हल्ला फक्त स्पाइक प्रोटीनवर होतो. बोत्सवाना प्रकारात स्पाइक प्रोटीनमध्ये 32 उत्परिवर्तन असल्याने, लशीला प्रभावहीन करण्यास हा व्हेरिएंट सक्षम आहे. हाँगकाँगच्या दोन्ही रुग्णांनी फायझर लसीचा डोस घेतला होता, तरीही त्यांना संसर्ग झाला. हा नवा व्हेरिएंट लशीचा प्रभाव संपुष्टात आणण्यास सक्षम असल्याचे तज्ज्ञ म्हणतात.