सोलापूर : सोलापुरात संतापलेल्या एका नगरसेवकाने भर सभागृहात नगरसचिवांना पाण्याची बाटली फेकून मारली. सोलापूर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत हा धक्कादायक प्रकार घडला. सत्ताधारी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी हे कृत्य केलं आहे. नगरसेवक सुरेश पाटील यांना रस्त्याच्या संबंधित विषयावर बोलायचे होते. मात्र महापौरांनी विषय संपला असून दुसरा विषय सुरू असल्याचे सांगत परवानगी नाकारली.
यावर वाद सुरू असताना नगरसचिव प्रवीण दंतकाळे हे पुढील विषयाचे वाचन करत होते. यावर संतापलेल्या नगरसेवक सुरेश पाटील यांनी चक्क पाण्याची बाटली त्यांच्या दिशेने फेकून मारली. यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी सुरेश पाटील यांना सभागृहातून बाहेर काढण्याचा सूचना केल्या. दरम्यान या घटनेनंतर सभागृहात एकच खळबळ उडाली.
दरम्यान नगर सचिव प्रवीण दंतकाळे हे केवळ महापौरांचे ऐकून चुकीच्या पद्धतीने काम करतात. कोणत्याही सभेचा इतिवृत्तांत देत नाही. इतिवृत्तांत दिल्यास घोटाळे बाहेर निघतील अशी त्यांना भीती असावी. त्यांच्या चुकीच्या कामाचा निषेध करण्यासाठी मी पाण्याची बाटली फेकली अशी प्रतिक्रिया नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिली.
सुरेश पाटील म्हणाले की, नगरसचिव सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर काम करतात. त्य़ांचं कामकाज चुकीच्या पद्धतीनं सुरु आहे. महापौर आमच्या नेत्या आहेत. त्या माझ्या भगिनी आहेत. विषय सर्वांना कळला पाहिजे. कोण भाष्य करणार आहे हे ऐकून वाचन करायला हवं. मात्र हे नगरसचिव केवळ महापौरांचं ऐकूनच कामकाज चालवत आहेत, म्हणून नगरसचिवांवर बाटली फेकून मी निषेध नोंदवला आहे, असं सुरेश पाटील म्हणाले.