मुंबई : राज्य सरकारने राजर्षी शाहू शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजनेची व्याप्ती वाढवली आहे. या योजनेत आता कृषी अभ्यासाचाही समावेश करण्यात आला आहे.


शिवाय या योजनेचा लाभ आता ओबीसींप्रमाणेच ईबीसी विद्यार्थ्यांना होणार आहे. कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. तर दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी गुणांची अट शिथिल करण्यात आली आहे.

बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या ईबीसी वर्गातील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यासाठी कुटुंबाची उत्पन्न मर्यादा अडीच लाख करण्याचा निर्णय राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यापूर्वी ईबीसी सवलतीसाठी पालकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा एक लाख इतकी होती.

ईबीसी वर्गात मोडणाऱ्या विद्यार्थ्यांना राज्य शासनाकडून शिक्षण शुल्कापोटी 50 टक्के रकमेची प्रतिपूर्ती करण्यात येते.

वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय शिक्षण (MBBS & BDS) घेणाऱ्या  विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीयकृत अथवा शेल्युल्ड बँकेतून घेतलेल्या शैक्षणिक कर्जावरील व्याज शासन भरणार, असा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचा लाभ होणार आहे.

योजनेच्या व्याप्तीत वाढ :

मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज योजनेसाठी निश्चित केलेल्या निवडक अभ्यासक्रमांच्या यादीत कृषी व संलग्न विषयाच्या पदवी, पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांचा समावेश करण्यास मान्यता देण्यात आली.  याशिवाय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पात्रतेसाठी दहावी किंवा बारावीच्या परीक्षेत 60 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक असल्याची अट शिथिल करण्यात आली.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील काही पदविकाधारक विद्यार्थी निवडक व्यावसायिक पदवी अभ्यासक्रमासाठी थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतात, अशा विद्यार्थ्यांसाठी 10 वीच्या परीक्षेत 60 टक्के गुणांच्या अटींऐवजी संबंधित पदविका अभ्यासक्रमाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षेत किमान 50 टक्के गुण मिळविणे आवश्यक करण्यात आले आहेत. तसेच या निर्णयांमुळे पात्र ठरणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम सुलभ आणि तात्काळ मिळावी यासाठी ती पात्र लाभार्थ्यांच्या आधारसंलग्नित बँक खात्यात थेट जमा करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

या योजनेतील अटींप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेंतर्गत लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्यांस काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. त्यानुसार लाभार्थी विद्यार्थ्यांनी महाविद्यालय अथवा तंत्रनिकेतनामध्ये शिक्षणासाठी वर्गात उपस्थित राहणे व प्रत्येक सत्रात अथवा वर्षाची परीक्षा देणे आवश्यक राहील.

पात्र लाभार्थी विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेतल्यानंतर एखाद्या सत्राची (सेमिस्टरची) परीक्षा दिली नसल्यास किंवा एखाद्या  शैक्षणिक वर्षात अनुत्तीर्ण झाल्याने त्या वर्षासाठी प्रवेश मिळाला नसल्यास पुढील वर्षाकरिता असा विद्यार्थी या योजनेचा लाभ मिळण्यास अपात्र राहील. मात्र, त्यानंतर पुन्हा त्या सत्रात अथवा वर्षात परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर अथवा अंशत: पास (ATKT) झाल्याने त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश मिळाल्यास या योजनेच्या लाभासाठी पुन्हा पात्र ठरेल. मात्र, असे पात्र लाभार्थी विद्यार्थी अभ्यासक्रमास प्रवेश घेतल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या एकूण कालावधीत दोन किंवा त्यापेक्षा अधिक वेळा पूर्णत: अनुत्तीर्ण झाल्यामुळे त्या अभ्यासक्रमाच्या पुढील शैक्षणित वर्षासाठी प्रवेश मिळाला नसेल, तर संबंधित विद्यार्थी प्रवेश घेतलेल्या अभ्यासक्रमाच्या उर्वरित कालावधीसाठी या योजनेंतर्गत लाभाकरिता कायमस्वरुपी अपात्र ठरेल.

या योजनेच्या लाभासाठी आधारसंलग्नीत बायोमॅट्रीक उपस्थिती प्रणालीमध्ये किमान 50 टक्के शैक्षणिक उपस्थिती आवश्यक असेल. तसेच सदर योजनेंतर्गत जे विद्यार्थी शासकीय किंवा अशासकीय वसतिगृहात अथवा भाडेतत्त्वावर शैक्षणिक प्रयोजनार्थ वास्तव्य करीत असल्यास त्या पात्र लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळेल.