नाशिक: आंतरजातीय विवाहाच्या रागापोटी गर्भवती मुलीची हत्या करणाऱ्या नराधम बापाला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली आहे. 2013 मध्ये एकनाथ कुंभारकर यानं रिक्षात बसलेल्या गर्भवती मुलीचा दोरीनं गळा आवळून खून केला होता. या संपूर्ण प्रकरणाच्या सुनावणीनंतर काल (सोमवार) आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.


काय आहे नेमकं प्रकरण?

- समाजात बदनामी होत असल्याच्या रागातून आरोपीनं पोटच्या मुलीची हत्या केली होती.

- जून २०१३ मध्ये प्रमिला उर्फ निशा दीपक कांबळे या गर्भवती मुलीचा रिक्षात गळा आवळून निर्घृण खून करण्यात आला होता. आरोपी एकनाथ कुंभारकर याची मुलगी निशानं आंतरजातीय विवाह केला होता.

- आई आजारी असल्याचे सांगून एकनाथ कुंभारकरनं मुलगी निशाला रिक्षात घेऊन गंगापूर रोडवर नेलं. एका हॉस्पिटलजवळ रिक्षा थांबवून रिक्षा चालकास मुलीच्या आईला बोलवण्यास पाठवले. या संधीचा फायदा घेऊन आरोपीने निशाचा दोरीनं गळा आवळत निर्घृण खून केला होता.

- रिक्षा चालक प्रमोद आहिरे यांनी हा सर्व प्रकार पाहिला. त्याने मुलीस सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र तिचा आणि पोटातील गर्भाचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

- याप्रकरणी एकनाथच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. रिक्षा चालक  प्रमोद अहिरेची एकमेव साक्ष महत्वाची ठरल्याने नराधम बापाला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.