Raj Thackeray Pune Rally News Updates :  मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडली. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारलं होतं, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ते म्हणाले. पावसात भिजून भाषण करावं म्हटलं पण निवडणुका नाही, काही नाही, उगाच कशाला भिजत भाषण करा? अशा शब्दात राज ठाकरेंनी शरद पवारांना नाव न घेता टोमणा मारला. 


राज ठाकरे म्हणाले की, अयोध्या दौऱ्याच्या विरोधाला महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली. या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला. दौरा तुर्तास रद्द झाल्यानं अनेकांना वाईट वाटलं. बाबरीच्या वेळी अनेक कारसेवकांना मारण्यात आलं. त्यांची प्रेतं फेकली गेली. मला त्यांचंही दर्शन घ्यायचं होतं. मी हट्टानं जायचं ठरवलं असतं तरी हजारो माझे सैनिक अयोध्येला आले असते. आणि तिथं जर काही झालं असतं तर आपली पोरं अंगावर गेली असती. तुमच्यावर केसेस टाकल्या गेल्या असत्या. हकनाक तुमच्यामागे ससेमिरा टाकला गेला असता. मी आपली पोरं अशी हकनाक घालवणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. ऐन निव़डणुकीच्या वेळी या सर्व गोष्टी केल्या असत्या आणि निवडणुकीला इथं कुणीच नसतं. माझी महाराष्ट्रातली ताकद हकनाक तिकडं सापडली असती. माझ्यावर टीका झाली तर होऊ द्या, पोरं मी अडकू देणार नाही, असंही राज ठाकरे म्हणाले. 


मी माफी मागावी याची मागणी केली, यांना आता 12-14 वर्षांनंतर जाग आली. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत. विषय माफी मागण्याचाच आहे ना मग गुजरातमध्ये अल्पेश ठाकूर नावाच्या नेत्यांनं यूपी,बिहारच्या लोकांना हाकलून दिलं. ती लोकं मुंबईत आले, इथं आओ जाओ घर तुम्हारा. तिथं गुजरातमध्ये कोण माफी मागणार, असं राज ठाकरे म्हणाले. हे राजकारण समजून घेणं गरजेचं आहे. यांना आपलं हिंदूत्व झोंबलं, लाऊडस्पिकर झोंबले, असं राज ठाकरे म्हणाले.


राणा दाम्पत्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, ते मातोश्रीवर हनुमान चालिसा म्हणायला जाणार होते. मातोश्री काय मशीद आहे काय? असा सवाल त्यांनी केला. मोठा गोंधळ, आरोप प्रत्यारोप झाले. एवढा गोंधळ होऊन संजय राऊत आणि राणा दाम्पत्य लडाखमध्ये एकत्र जेवताना दिसले. हे सगळे ढोंगी आहेत, असं राज ठाकरे म्हणाले. 


राज ठाकरे म्हणाले की, माझं पायाचं दुखणं सुरु आहे. त्यामुळं कमरेलाही त्रास होतोय. दुखणं वाढलं असल्यानं एक तारखेला शस्त्रक्रिया करतोय, असं त्यांनी सांगितलं.


भाषणाच्या आधी कार्यक्रमाच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी काही अंध विद्यार्थ्यांना मंचावर बोलावून त्यांना तिथं बसण्याची व्यवस्था केली. आपल्या सभेला हॉल परवडत नाहीत, एसपी कॉलेजला विचारलं होतं, पण त्यांनी सभेसाठी नकार दिला. आता आम्हाला नाही तर कुणालाच नाही, असं ते म्हणाले. या सभेला राज्यभरातून हजारो मनसे कार्यकर्ते उपस्थित होते. 


पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला आहे. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली.