Raj Thackeray :  गेले अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा अयोध्या दौरा अखेर स्थगित झाला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत ट्वीट करून माहिती दिली आहे. मात्र, पुण्यातील सभा होणार असून मनसैनिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन राज यांनी ट्वीटमध्ये केले आहे. प्रकृतीच्या कारणामुळे 5 जूनला होणारा अयोध्या दौरा (Ayodhya Tour) पुढे ढकलला जाऊ शकतो, अशी चर्चा सुरू होती.







मनसैनिकांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारीही सुरु झाली होती. अशातच उत्तर प्रदेशमधून मात्र राज यांच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध करण्यात आला होता. तरीदेखील राज ठाकरे आपल्या अयोध्या दौऱ्यावर ठाम होते. परंतु, आता मात्र, राज ठाकरेंनी अयोध्या दौरा स्थगित केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी ट्वीट करून अयोध्या दौरा स्थगित केल्याची घोषणा केली. मात्र, त्याचवेळी या मुद्यावर सविस्तरपणे बोलण्यासाठी पुण्यातील सभेत येण्याचे आवाहन राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना केले आहे. 


राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेतल्यानंतर त्यांनी अयोध्या दौरा करणार असल्याची घोषणा केली होती. राज ठाकरेंच्या या घोषणेनंतर राज्यातून मनसे पदाधिकाऱ्यांकडून अयोध्या दौऱ्याची जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती.


उत्तर भारतातून राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध 


राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची घोषणा झाल्यापासूनच त्यांच्या दौऱ्याला अयोध्येतील साधू संत, तसेच भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा विरोध आहे. "आधी राज ठाकरेंनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि त्यानंतर त्यांनी अयोध्येत यावं", असं भाजप खासदार म्हणतात. तर मुस्लिम पक्ष आणि बाबरी मशिद प्रकरणी पक्षकार असलेले इक्बाल अन्सारी यांनी देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यालाही विरोध केला होता.