मुंबई: बुडीत निघालेली आयएल अॅण्ड एफएस कंपनी मागील काही महिन्यांपासून संकटात आहे. या कंपनीने अनेक ठिकाणी गुंतवणूक केली आहे, यापैकी एक म्हणजे दादरमधील कोहिनूर सीटीएनएल. आयएल अॅण्ड एफएस कंपनीचे बरेच व्यवहार संशयास्पद आहेत यामुळे या व्यवहारात मनी लॉड्रिंग झालं आहे का या अनुषंगाने तपास सुरु असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उन्मेष जोशी चौकशासाठी ईडीच्या रडारवर आहेत. या सर्व प्रकाराने राजकीय चर्चांनादेखील उधाण आले आहे.


आयएल अॅण्ड एफएस ही एक नामवंत फायनान्स कंपनी होती मात्र कंपनीबाबत बऱ्याच तक्रारी असल्याने कंपनीविरोधात दिल्ली येथे गुन्हा दाखल करण्यात ला आहे. आयएल अॅण्ड एफएसने मुंबईतील एका कंपनीला मोठ्या प्रमाणात कर्ज दिल्याचं चौकशीत उघडकीस आलं. कोहिनूर स्क्वेअर टॉवर्सच्या उभं करण्यामागे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा मुलगा उन्मेष जोशी यांनी गुंतवणूक केली होती. आयएल अॅण्ड एफएसचा या व्यवहाराशी कसा संबंध आहे याची चौकशी सध्या ईडी करत आहे.

काही वर्षांपूर्वी एनमसीटीच्या मालकीची असलेल्या कोहिनूर मिल क्रमांक 3 च्या जागेचा लिलाव झाला होता. ही जागा अगदी मोक्याच्या ठिकाणी म्हणजे दादरमधील शिवाजी पार्क येथे शिवसेना भवनाच्या अगदी समोर आहे. या जागेचा लिलाव 421 कोटी रुपयांना झाला आणि ही जागा मनोहर जोशींचा मुलगा उन्मेष जोशी यांच्या कंपनीने विकत गेतली.  उन्मेष जोशी यांच्या कंपनीत स्वतः उन्मेष जोशी, राज ठाकरे आणि राजन शिरोडकर हे तिघे समान भागीदार होते. कोहिनूर मिलची जागा विकत घेताना उन्मेष यांनी आयएल अॅण्ड एफएसला ही सोबत घेतलं. 421 कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम उन्मेष जोशी तर उर्वरित पन्नास टक्के रक्कम आयएल अॅण्ड एफएस कंपनीने भरले. काही वर्षांनंतर आयएल अॅण्ड एफएसने आपला 50 टक्के हिस्सा 90 कोटी रुपयांना विकला. गुंतवणूक 225 कोटींची असूनदेखील तो हिस्सी कंपनीने 90 कोटी रुपयांना विकला आणि त्यानंतरदेखील आयएल अॅण्ड एफएस उन्मेष जोशींच्या कंपनीला कर्ज देत होते.

उन्मेष जोशी यांच्या कंपनीला सुमारे 500 कोटी रुपयांचं लोन दिल होतं, ते कंपनीला चुकतं करणं शक्य नसल्याने त्या 500 कोटी रुपयांच्या बदल्यात जागा घेण्याचा आयएल अॅण्ड एफएस कंपनीने निर्णय घेतला. साधारण 2011 साली आयएल अॅण्ड एफएसने उन्मेष यांच्या कंपनीकडून 500 कोटींची जागा घेतली, मात्र या व्यवहाराबाबतची नोंदणी 2017 साली करण्यात आली. हा संशयास्पद व्यवहार असल्याचं ईडीच्या सूत्रांचं म्हणणं आहे.

देशात सध्या सत्तेत असलेल्या भाजप सरकारवर ईडी आणि इतर तपास यंत्रणेचा गैरवापर करुन विरोधकांच्या अडचणी वाढवली जात असल्याचा आरोप केला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत  भाजपविरोधात घेतलेली भूमिका जगजाहीर आहे,त्यामुळे तपास करण्याच्या नावाखाली राज ठाकरे आणि उन्मेष जोशी यांना टार्गेट करत आहेत की काय अशी चर्चा सुरु आहे.