Raj Thackeray : टोलच्या झोलवर सातत्याने आक्रमक पवित्रा घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा टोलनाक्यावर झालेली गर्दी पाहून स्वत: रस्त्यावर उतरून वाहनांची गर्दी कमी केली. यावेळी हजारोंच्या संख्येनं वाहने नाक्यावर पाहून राज यांचा पारा चांगलाच चढला. त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांची सुद्धा खरडपट्टी केली. आज नाशिक दौऱ्यातही त्यांनी टोलचा मुद्दा उपस्थित केला होता. आज नाशिक दौरा आटोपून राज ठाकरे मुंबईच्या दिशेने जात असताना ठाणे टोलनाक्यावर हजारोंच्या संख्येने गाड्या रांगेत ट्रॅफिकमध्ये अडकल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांची होत असलेली गैरसोय बघून स्वतः राज ठाकरे टोलनाक्यावर गेले. यावेळी अडकलेल्या शेकडो वाहनांना रस्ता करुन दिला आणि ठाकरे शैलीत सज्जड दम दिला. 






तुम्हाला टोलचा झोल का नाही दिसत? 


दरम्यान, नाशिक दौऱ्यात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, टोलला माझा विरोध नाही. माझी मागणी आधीपासून इतकीच आहे. टोलच्या व्यवहारात पारदर्शकता हवी जी आपल्याकडे नाही. जगभरात टोल असतोच, पण आपल्याकडे नक्की किती टोल भरलाय ह्याचा हिशोब लोकांना दिला जात नाही ह्याचा मला राग आहे. उद्या (3 फेब्रुवारी) मी मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि त्यांच्या समोर मध्यंतरी टोलनाक्यांवर जी आकडेवारी गोळा केली आहे ती सादर करणार आहे. लोकांच्या पैशानी जर टोलचा कंत्राटदार गब्बर होणार असेल किंवा राजकीय पक्षांच्या निधीत भर पडणार असेल तर माझा विरोध आहे. पत्रकारांना टोलच्या आंदोलनानंतर फुटलेल्या काचा तुम्हाला दिसतात पण तुम्हाला टोलचा झोल का नाही दिसत? 






इतर महत्वाच्या बातम्या