Manoj Jarange Maratha Reservation :  मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्याबाबत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी आता पोलीस तैनात असणार आहे. जरांगे यांना सरकारी सुरक्षा प्रदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आजपासून जरांगे यांच्या सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 


राज्य गुप्त वार्ता विभागाच्या आदेशाने मनोज जरांगे यांना पोलीस सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे यांच्या सुरक्षेसाठी 24 तास दोन सशस्त्र  पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. दरम्यान, त्याआधी सकल मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांकडे मनोज जरांगे यांना सुरक्षा पुरवण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार आजपासून दोन कॉन्स्टेबल सुरक्षेसाठी नेमण्यात आले आहेत. 


मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण सुरु केले होते. या उपोषणस्थळी पोलिसांची लाठीचार्ज झाला आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले. त्यानंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन संपूर्ण राज्यभरात पोहचले. जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती. जरांगे यांच्या आंदोलनाने राज्यातील मराठा आरक्षण आंदोलनाचा वणवा पुन्हा एकदा पेटला. मराठा समाजाने आरक्षणासाठी मुंबईवर मोर्चा काढला. 


या मुंबई मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानंतर नवी मुंबईत आल्यानंतर राज्य सरकारने जरांगे यांना सरकारने आश्वासन दिल्यानंतर मोर्चा स्थगित करण्यात आला. 


ओबीसी संघटनांचा विरोध


मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास काही ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध नाही. मात्र, ज्यांच्याकडे कुणबी प्रमाणपत्र नाही, अशांना कुणबी प्रमाणपत्र आरक्षण देण्यास ओबीसी संघटनांनी विरोध केला आहे. 


सगेसोयरे अध्यादेशाला प्रतिभा धानोरकरांचा कडाडून विरोध


राज्यसरकारने काढलेल्या सगेसोयरे अध्यादेशाला चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर (MLA Pratibha Dhanorkar) यांनी कडाडून विरोध केलाय. विशेष म्हणजे या अध्यादेशाविरुध्द 7 तारखेला चंद्रपुरात ओबीसी, एसबीसी आणि व्हीजे-एनटी यांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. या मोर्चात आमदार धानोरकर यांचा देखील सक्रीय सहभाग असणार आहे. आमदार प्रतिभा धानोरकर यांनी या अध्यादेशाविरुध्द ओबीसी (OBC Reservation) एकवटतील असा इशारा दिला असून लोकसभेत देखील हा मुद्दा गाजणार असल्याचं सूतोवाच केलं