रायगड : कोणीही लोकप्रतिनिधी नसताना आज मुंबई महापालिका अर्थसंकल्प सादर झाला. मुंबईमधील कोस्टल रोडचे भूमिपूजन माझ्या हाताने झालं, आता उद्घाटन पंतप्रधान करत आहेत, त्यांना हे तरी कळेल मी बोलतो ते करतो, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टोला लगावला. उद्धव ठाकरे जनसंवाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर रायगड दौऱ्यावर आहेत. त्यांनी रायगड जिल्ह्यातील माणगावमधील सभेतून शिंदे फडणवीस सरकारसह भाजपचा समाचार घेतला. भगवतगीता सुद्धा अधर्मविरोधात लढा द्यायचा असेल तर नातेवाईक समोर आले तरी लढाई करावीच लागणार असे सांगते, असेही ते म्हणाले. 


ते म्हणाले की, कोस्टल रोडचे उद्घाटन करताना काम पूर्ण झालं आहे का पाहून घ्या. नाही तर राम मंदिरासारखं घाईगडबडीत उद्घाटन करताय निवडणूक जवळ आल्या म्हणून? अशी विचारणा त्यांनी केली. पंतप्रधान तुम्ही अरबी सुमद्रात शिवस्मारक कधी पूर्ण होणार? हे एक फुल दोन हाफला विचारा. तुम्हीच भूमिपूजन केला होतं ना?? मग विचारा पुढे काय झालं? असेही ते म्हणाले. 


मुंबई गोवा हायवेवर सुद्धा फेरफेटका मारा


जसं कोस्टल रोड पाहायला येताय, तसं मुंबई गोवा हायवेवर सुद्धा फेरफेटका मारा, किती वर्ष झाली? या रस्त्याच्या कामाला, असा टोलाही त्यांनी लगावला. ठाकरे पुढे म्हणाले की, या ठिकाणी गद्दार खासदाराने विचारलं, माझ्या मेळाव्याला गर्दी किती होणार? ही गर्दी आता त्यांना दिसेल. मला शिवाजी पार्कमध्ये झालेल्या शिवसेना दसरा मेळाव्याची आठवण झाली तेव्हा सुद्धा म्हणत होते गर्दी होणार नाही. जेव्हा मेळावा झाला तेव्हा गर्दी ओसंडून वाहत होती. 


मुख्यमंत्री खुर्चीचे स्वप्न अनेक वेडे पाहतात, पण त्यांना बसता येत नही. मंत्रिपद मिळेल म्हणून वाट पाहतात, जॅकेट नॅपकिन विकत घेऊन तयारी करतात पण होत काहीच नाही, असे म्हणत गोगावलेंचाही समाचार घेतला. नितीशकुमार नंतर आता उद्धव ठाकरे जाणार? अशी चर्चा करताय, मी का जाणार? यांची साथ 25 वर्ष अनुभवली पाठ मागे केली की वार करायची संधी भाजप सोडत नाही.


उद्धव ठाकरे म्हणाले.. 



  • ‘मी आणि फक्त मीच‘ ह्या वृत्तीविरोधात मी लढत आहे.

  • नड्डाजी, देशाला हलक्यात घेऊ नका; हा इंग्रजाना घालवणारा देश आहे.

  • तुमच्या खुर्चीसाठी बाळासाहेबांनी शिवसेनेला जन्म दिला नव्हता, मराठी माणसाच्या, हिंदूंच्या न्याय हक्कासाठी दिला होता.

  • आज सरदार पटेल नाहीत म्हणून तुम्ही त्यांचा पुतळा बांधला, पण त्यावेळी आरएसएसला विरोध करणारे सरदार पटेल; आज तुम्हाला पटले असते का?

  • ‘चोरीचा मामला आणि जोरजोरात बोंबला‘ असला प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे.

  • आमच्याकडे काळ्या टोपीची माणसं नाहीत, भगव्या मनाची आणि भगव्या टोपीची माणसं आहेत.

  • आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं आहे, आला अंगावर तर घेतला शिंगावर!

  • माझ्या देशावर प्रेम करणाऱ्यांनी मला कुराण दिलंय, पाकिस्तानमध्ये जाऊन केक खाणाऱ्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये.

  • महाराष्ट्रात मतांसाठी येताय, मग मणिपूरमध्ये का जात नाहीत?

  • शिवस्मारक कधी होणार? हा जाब तुमच्या एक फुल दोन हाफ सरकारला विचारा!

  • जे पक्ष त्यांच्या सोबत राहिले त्यांनाच संपवायचं, ही भाजपची प्रवृत्ती आहे.

  • आम्ही केलेल्या रस्त्यांवर आमचा पंतप्रधान चालेल, ह्याला आमचं सौभाग्य म्हणायचं का?


इतर महत्वाच्या बातम्या