मुंबई : विदर्भ काँग्रेसचा (Congress)  बालेकिल्ला होता नंतर भाजपचा (BJP)  बालेकिल्ला झाला. काही काळानंतर सत्तांतर होत असते. नवीन लोक येतात आणि जुने जातात.  हे पोट्टं कुठे काय करणार? असे  विरोधक म्हणत असतात. मात्र तुम्ही खचून जाऊ नका कारण मात्र हाच पोट्टा वरवंटा फिरवणार असा इशारा मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray)  मनसेला हसणाऱ्यांना दिला आहे. पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं, पराभवानंतर खचून जाऊ नका, असा कानमंत्र देखील मनसे पदाधिकाऱ्यांना दिला. ते नागपुरात बोलत होते. 


राज ठाकरे म्हणाले, आज नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती पत्र देण्यासाठी नागपुरला आलो. काही महिन्यांपूर्वी  मी जेव्हा नागपुरात आलो होतो,  तेव्हा मी परत गेल्यावर  मनसेला पदाधिकारी नेमणूक करण्यासाठी माणसं मिळत नाही, अशी टीका करण्यात आली.  मात्र आजचे चित्र तशी टीका करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे आहे. 


पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं : राज ठाकरे


पक्ष उभारणीसाठी जीवाचं रान करावं लागतं. काँग्रेसच्या लोकांनी खूप संघर्ष केले. बाळासाहेब ठाकरे यांनीही अनेक वर्ष संघर्ष केले. 1966 ला शिवसेना स्थापन झाली मात्र सत्ता 1995 ला आली. आजचे राजकारण पाहता प्रत्येकाला असे वाटते की, सर्वांना सर्व गोष्टी लवकर हव्या आहेत.  सर्व पटकन झालं पाहिजे. मात्र त्यासाठी जीवाचं रान करावं लागते. आपल्याही जीवनात विजय झाले, पराभव झाले, मात्र खचलो नाही कधी आणि खचणार नाही.  ज्या कुटुंबात माझा जन्म झाला तिथे असे संस्कारच नाही. आज ज्यांना नियुक्ती मिळाली आहे, त्यांच्यात काम करण्याची आग असली पाहिजे.. पराभव होतील मात्र खचून जाऊ नका. विरोधक तुमच्यावर हसतील, हे काय करत आहे असं म्हणतील.  फक्त पाय जमिनीत रोवून उभे रहा, विजय आपलाच आहे, असा कानमंत्र राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिला आहे


मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपुरात दौऱ्यावर आहेत.  पक्षाच्या विस्तारासाठी स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. यावेळी नवीन शाखाध्यक्षांना नियुक्ती पत्र देखील दिले. सायंकाळपर्यंत वसंतराव देशपांडे सभागृहात त्यांच्या पक्षीय बैठका होणार आहेत.  दरम्यान हिवाळी अधिवेशनामुळं सर्वच राजकीय पक्षांचे नेते नागपुरात आहेत. अशात मनसे अध्यक्ष राज ठाकरे नागपूर दौऱ्यावर  आहेत. त्यामुळे आता या दौऱ्यात कोणत्या राजकीय नेत्यांची भेट घेणार हे पाहणं देखील महत्वाचं असणार आहे.याआधी सप्टेंबर महिन्यातही राज ठाकरे यांनी नागपूर दौरा केला होता.