Rain in Maharashtra : सध्या राज्यात एकीकडे उन्हाचा चटका वाढत असताना काही भागात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. हवामान विभागाने (India Meteorological Department) 21 आणि 22 एप्रिलला वादळी वाऱ्यासह  पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्यानुसार मुंबईत पावसानं हजेरी लावली आहे. मुंबईतल्या चेंबूर, भांडुप, नाहूर, मुलुंड परिसरात पावसानं हजेरी लावली आहे. तसेच पुणे आणि सातारा जिल्ह्यातील काही भागातही पावसानं हजेरी लावली आहे.


दरम्यान, पुढील  ३-४ तासात पालघर, नाशिक, धुळे आणि नंदूरबारमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागात सकाळपासूनच ढगाळ आकाश आहे. तर काही भागात हलका पाऊसही सुरु आहे. वाढत्या उष्णतेमुळं अंगाची लाही लाही होत असताना राज्यात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला होता. पश्चिमी चक्रवातामुळे आणि कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्यामुळे दोन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून  देण्यात आला होता. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात 21 एप्रिलपासून पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला होता. मराठवाड्यासह तळकोकणाला या वादळी वाऱ्याचा अधिक फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  




सध्या मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. त्याठिकाणी देखील पुढच्या  तीन ते चार तासात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळालासुध्दा वातावरणाचा फटका बसत आहे. सतत होणाऱ्या वातावरणातील बदलामुळे चिपी विमानतळावर आठवड्यातून बुधवार, शुक्रवार व रविवार हे तीन दिवस मुंबईहून सकाळी 7.40 वाजता अलायन्स एअरचे विमान सुटून 9.55 ला चिपी विमानतळावर लॅन्डिंग होणार आहे. तर सोमवार, मंगळवार, गुरुवार व शनिवार हे चार दिवस मुंबईहून 12 वाजता टेक ऑफ घेतलेले विमान चिपी विमानतळावर 1.25 ला लॅन्डिंग होऊन पुन्हा 1.50 ला मुंबईकडे जाण्यासाठी टेक ऑफ घेणार आहे. वातावरणातील बदलामुळे चिपी विमानतळावरील येणाऱ्या विमानाच्या वेळेत बदल करण्यात आले आहेत. पावसाळ्यात चिपी विमानतळाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. कारण सिंधुदुर्गात पडणारा पाऊस, वातावरणात होणारे बदल, दाट धुकं यामुळे फटका बसण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या: