मुंबई : कोकणात वर्दी लावल्यानंतर अखेर मान्सूननं मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात हजेरी लावली आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, बीड जिल्ह्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. तर परभणी शहरासह सेलू, मानवत, पाथरी तालुक्यात मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. उस्मानाबाद, हिंगोली शहरालाही पावसानं झोडपलं असून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या मराठवाड्यात अखेर पाऊस झाल्यानं बळीराजा सुखावला आहे. हवेत गारवा आणि निसर्गात चैतन्य आणणारा पाऊस झाल्यानं नागरिकांमध्येही आनंदाचं वातावरण आहे. दुसरीकडे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर शहरासह बार्शी, अक्कलकोट भागातही पावसाच्या चांगल्या सरी बरसल्या आहेत. बीडमध्ये पहिल्या पावसाच्या पाण्याची पूजा दुष्काळात होरपळणाऱ्या बीड जिल्ह्यात आज पावसाने हजेरी लावली. या पावसाच्या स्वागतासाठी लोक देखील पुढे सरसावले. जिल्ह्यातील नामलगावच्या गणपती मंदिराच्या समोर पहिल्या पाण्याची पूजा केली गेली. या मंदिराच्या बाजूने करपरा नदी वाहते. या वाहणाऱ्या नदीचं पाणी कल्लोळात जमा होतं. तिथून पुढे ते नदीत वाहून जातं. यावेळी गणपती मंदिराच्या पुजाऱ्यांनी या पाण्याची विधिवत पूजा केली. हिंगोलीत  वीज पडून दोन जनावरं मृत, शेतमजूर गंभीर जखमी हिंगोलीमध्ये अनेक भागात रात्री पाऊस पडला. हिंगोली तालुक्यातील वाझोळा येथे काल सायंकाळच्या वेळी अचानक सुसाट वाऱ्यासह पावसाने जोर धरला होता. यावेळी वीज पडून दोन जनावरं मृत झाली तर  एक शेतमजूर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. एकनाथ रामजी धवसे असं जखमी  शेतमजूराचं  नावं आहे.  जखमीला तात्काळ वाशीम इथं रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. दरम्यान जिल्ह्यात सध्या स्थितीत ढगाळ वातावरण असून पावसाची शक्यता आहे. नाशिक : पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यात काल संध्याकाळच्या सुमारास तालुक्यातील वायगाव, सारदे, कोठरे, दुंधे भागात पहिल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावले असून शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. सोलापुरातही जोरदार पाऊस सोलापूर शहर आणि जिल्ह्यात रात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. सोलापूरसह अक्कलकोट, बार्शी परिसरात काल रात्री जोरदार पाऊस झाला.