सांगली : पत्नीला पळवून नेल्याच्या रागातून पत्नीच्या प्रियकराचा खून झाल्याची घटना सांगलीमध्ये घडली आहे. हात बांधून डोक्यात घाव घालून हा खून करण्यात आला आहे. गणेश रजपूत असं मृत तरुणाचं नाव आहे. काल दुपारी तीनच्या सुमारास ही घटना घडली. सचिन संतराम होळीकट्टी आणि चंद्रकांत ऊर्फ पिंटू नारायण पुजारी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. होळीकट्टी हा या खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. त्याच्याच पत्नीला मृत गणेश रजपूतने काही महिन्यांपूर्वी पळवून नेलं होते. याचा राग होळीकट्टी अनेक दिवसापासून मनात धरुन होता.

सांगलीच्या मीरा हाऊसिंग सोसायटीच्या मागील बाजूस असणाऱ्या तात्यासाहेब मळ्यात काल दुपारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पत्र्याच्या शेडमध्ये लाकडी दांडक्याने गणेश रजपूत (वय वर्ष 25) तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. मयत गणेश रजपूत आणि होळीकट्टी यांच्यात मैत्री होती. त्यामुळे गणेशचे होळीकट्टीच्या घरी येणं-जाणं होत. त्यातच गणेशचे होळीकट्टीच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध निर्माण झाले होते. मग गणेशने त्याच्या पत्नीला पळवून नेलं होतं. याचा राग होळीकट्टीच्या मनात होता.

गणेश काही कामानिमित्त गुरुवारी (19 जून) सांगलीमध्ये आला होता. त्यावेळी तो त्याच्या घरी आला असल्याची माहिती आरोपीला मिळाली. यानंतर शुक्रवारी (22 जून) सकाळच्या सुमारास सचिन होळीकट्टीने त्याच्या एका मित्रासह गणेशला आपल्या रिक्षातून मीरा हाऊसिंग सोसायटीच्या मागील बाजूस असणाऱ्या तात्यासाहेब मळा इथल्या पत्र्याच्या शेडमध्ये नेले. तिथे त्याचे हात बांधून डोक्यात लाकडी काठ्यांनी मारहाण करुन खून केला आहे.

दुपारच्या सुमार खुनाची घटना उघडकीस आली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. खुनाची माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला . तर अप्पर पोलीस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनीही धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली होती. या प्रकरणी पोलिसांनी सचिन संतराम होळीकट्टी आणि चंद्रकांत ऊर्फ पिंटू नारायण पुजारीला बेड्या ठोकल्या आहेत.