Nagpur News नागपूर : नागपूर जिल्ह्यातील रामटेक (Ramtek) तालुक्यात एका अपघाताची (Accident) बातमी समोर आली आहे. यात मोबाइलचे अति जास्त व्यसन एक युवकाच्या जीवावर बेतलं आहे. कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडत असतांना एका 15 वर्षीय मुलाचा अपघात (Nagpur Accident) होऊन त्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. रेल्वे रुळ ओलांडत असताना समोरून येणाऱ्या भरधाव रेल्वेने धडक दिल्याने ही मृत्यूची घटना घडली आहे. मालगाडीच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रामटेक तालुक्यातील मनसर येथे शुक्रवारी घडलीय. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


रेल्वे रुळ ओलांडने 15 वर्षीय युवकाच्या जीवावर बेतलं


हल्ली मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. मात्र या मोबाइलचा अतिजास्त वापर आणि मोबाईलच्या व्यसनाचा परिणाम आपल्या जीवनावर देखील होऊ शकतो. अशीच एक घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्याच्या मनसर येथे घडली आहे. आर्यन केकटे नामक 15 वर्षीय मुलाला या मोबाईलचे व्यसन चांगलेच महागात पडले आहे. कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडत असतांना या मुलाला दिलेल्या रेल्वेच्या धडकेनंतर मृत्यू झालाय. आर्यन केकटे हा शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतीकडे जाण्यासाठी घरून सायकलवरून निघाला होता.


दरम्यान, तो वाटेत लागणाऱ्या रेल्वे रुळाजवळ सायकल उभी करून तो पायी रेल्वे रुळ ओलांडत होता. रेल्वे लाईनच्या पलीकडे त्याचे शेत होते. यावेळी त्याच्या कानात हेडफोन असल्याने त्याला इतर कुठलाही आवाज ऐकायला आला नाही. किंबहुना मोबाईलच्या नादात माघून रेल्वे गाडी येत असल्याचा साधा अंदाज देखील आला नाही.  दरम्यान रेल्वे रूळ ओलांडताना त्याला रामटेकहून इतवारीकडे जाणाऱ्या मालगाडीने जबर धडक दिली. रेल्वेच्या धडकेनंतर तो काही अंतरावर रुळांवर ओढला गेला, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. 


शेतीकडे जाण्यासाठी निघालेल्या युवकाचा जागीच मृत्यू 


घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी आणि पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आर्यनच्या हातात मोबाईल आणि कानात हेडफोन होते, त्यामुळे रेल्वे रूळ ओलांडतांना मालगाडी येत असल्याचे त्याला कळले नाही. तसेच  कानात लावलेल्या हेडफोन्स मध्ये आवाज सुरू असल्यामुळे त्याला मालगाडीचा हॉर्नही ऐकू आला नसावा. त्यामुळे तो या अपघाताचा बळी ठरला.


इतर महत्वाच्या बातम्या