रायगड : दुर्गराज रायगडला भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भेट दिली आहे. यावेळी त्यांना 'शिवकालीन होन'च्या प्रतिकृतीची भेट देण्यात येत आहे. आजच्या काळात जसं भारताचा रुपया देशाच्या स्वाभिमानाचं आणि सार्वभौमत्वाचं प्रतीक आहे त्याचप्रकारे शिवराई होन हे स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचं आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे. त्यामुळे हे होन म्हणजे नेमकं काय आहे हे समजून घेऊया.  


छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील सोनेरी पान. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या राज्याभिषेकावेळी प्रचलित केलेल्या सोन्याच्या नाण्यास 'शिवराई होन' म्हणतात. सर्व बाजारपेठेवर मुघल, आदिलशाही, कुतुबशाही व अशा अनेक चलनांचे वर्चस्व असतांना त्यांनी मोगली वर्चस्वाला व पर्शियन भाषेच्या प्रभावाला झुगारुन देवनागरी लिपीत पाडलेली स्वत:ची ‘नाणी’ ही एक दूरगामी व क्रांतिकारी घटना होती.


हेन्री ऑक्झिडेन याने राज्याभिषेकावेळी केलेल्या 'इंग्रजांची नाणी स्वराज्यात चालावी' या मागणीला शिवाजी महाराजांनी साफ नाकारून 'आमच्या राज्यात आमची नाणी चालतील' असे ठणकावून सांगितले होते.


नाणी अभ्यासक आशुतोष पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी महाराजांच्या 'शिवराई होन' नाण्यावर पुढील बाजूला बिंदूमय वर्तुळात देवनागरी लिपीत तीन ओळीत 'श्री राजा शिव' आणि मागील बाजूला दोन ओळीत बिंदूमय वर्तुळात 'छत्र पति' हे त्यांनी राज्याभिषेकावेळी स्वीकारलेले बिरुद अंकित आहे. हे नाणे सोन्याचे असून याचे वजन 2.8 ग्राम आहे तर या नाण्याचा व्यास हा 1.32 सेमी आहे.


रायगडवर टांकसाळीत 'होन'
शिवकाळात रायगडावरील टांकसाळीत 'होन' पाडण्यात येत होते. होन आज दुर्मीळ आहे. तो मिळणे केवळ महाराष्ट्र नव्हे तर देशवासीयांसाठी भाग्याची बाब आहे. हा केवळ होन नसून प्रत्येक मराठी माणसाकरिता ऊर्जा आहे. पुढील पिढ्यांसाठी ती प्रेरणा आहे.


शिवाजी महाराजांनी सुरु केलेले हे शिवराई होन आज अत्यंत दुर्मिळ झाले असून जगभरात केवळ बोटावर मोजता येतील एवढ्याच संख्येत उपलब्ध आहेत. आज भारतात केवळ छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय मुंबई व राष्ट्रीय संग्रहालय, दिल्ली येथे 'शिवराई होन' सार्वजनिकरित्या पाहता येतो. येथे प्रस्तुत होन संभाजीराजे छत्रपती यांच्या वैयक्तिक संग्रहातील आहे. शिवछत्रपतींनी निर्माण केलेल्या स्वराज्याच्या सार्वभौमत्वाचे व संपन्नतेचे प्रतीक म्हणजे 'शिवराई होन'. हे फक्त चलनी नाणे नसून आपली अस्मिता आहे; राष्ट्राचा अमूल्य ठेवा आहे.


रायगडवरच्या औकिरकर कुटुंबियांकडे वंश परंपरागत होन
आजच्या काळात होन अतिशय दुर्मिळ झालं असताना रायगड किल्ल्यावरच्या औकिरकर कुटुंबियांकडे शिवरायांनी दिलेले होन आहे. वंश परंपरेने मिळालेल्या या शिवकालीन 'होन'ची (सुवर्ण नाणे) जपणूक करणारे गडावरील औकिरकर कुटुंबिय पूर्वजांच्या इतिहासाचा अभिमान बाळगत आजही स्वाभिमानाने जगत आहे.


संबंधित बातम्या :