Mumbai Heavy Rain : मुंबईत (Mumbai) सलग तिसऱ्या दिवशी पावसाची जोरदार आणि धुवाधार बॅटींग सुरु आहे. मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून यासोबतच पश्चिम उपनगरातही जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबईत ठिकठिकाणी सखल भागात पाणी साचलं असून नागरिकांना त्रासाला सामोरं जावं लागत आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. हवामान विभागाकडून, मुंबईत आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पावसाने मुंबईत जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे मुंबईची 'तुंबई' झाली आहे. हवामान खात्याने ठाणे, रायगड, पुणे आणि पालघर या चार जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने रेड अलर्ट जारी केला आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबईची तुंबई
मुंबईतील किंग्ज सर्कल, अंधेरी सबवेमध्ये पाणी साचलं आहे. अंधेरी सब वेमध्ये पाणी साचल्याने तेथील वाहतूक बंद करण्यात आली आहे. अंधेरी सबवे खाली 2 ते 3 फूट पाणी साचल्याने प्रवाशांची कोंडी झाली असून परिणामी वाहतूक खोळंबली आहे. पावसामुळं वसई-विरारमधील तलाव ओव्हरफ्लो झाल्यानं रस्त्यांवर पाणी आलं आहे. त्यामुळे माणसांनी टाकलेला कचरा निसर्गाने साभार परत केल्याचं चित्र दिसून येत आहे. वसईच्या एव्हरशाईन सिटी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचा खच पडला आहे. आता सफाई कर्मचाऱ्यांसमोर कचरा उचलण्याचं आव्हान आहे.
राज्याच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता
उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राचा काही भाग, पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात पुढील काही तासांत अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. यासोबतच रायगड, गोवा आणि तेलंगणा मधील काही भागांत ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. या भागातही पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे खबरदारी बाळगण्याचं आवाहन हवामान खात्याकडून करण्यात येत आहे.
देशात 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा इशारा
देशातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. विशेषत उत्तर भारतात जोरदार पाऊस सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. काही भागात दरड कोसळल्याच्या तर काही ठिकाणी ढगफुटीच्या घटना घडल्याची माहिती आहे. हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, पुढील तीन ते चार दिवस देशात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये पूर्व भारतातील राज्यांसह उत्तर आणि पश्चिम भारताच्या काही भागात जोरदार पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.