रायगड : काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असल्याने मूर्तीकारांच्या कामाला वेग आला आहे. मात्र, राज्य सरकारकडून गणेश मूर्तींच्या उंचीवर निर्बंध घातल्याने मूर्तीकार अडचणीत आले आहेत. या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तींवरील उंचीची अट शिथील करण्याची मागणी रायगड जिल्ह्यातील पेण येथील मूर्तिकार आणि कारखानदारांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मूर्तीकारांशी चर्चा करून निर्बंध निश्चित करावेत असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले आहे. 


गणेशोत्सव हा कोकणी आणि हिंदू धर्मियांचा महत्वाचा उत्सव असून अनेकांची श्रद्धा या उत्सवाशी जोडलेली आहे. त्यातच, रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील हजारो कारखानदार आणि कामगारांची उपजीविका ही याच गणेशाच्या मूर्त्यांच्या उद्योगावर अवलंबून आहे. गेल्या वर्षभरात झालेली वादळं आणि कोरोनाच्या निर्बंधांमुळे या व्यवसायिकांवर आर्थिक संकट ओढावले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 


दरम्यान, यंदा देखील गणेशोत्सव हा साधेपणाने साजरा करण्याचे आदेश देण्यात आल्याने गणपतीच्या मूर्तीवर उंचीची मर्यादा ही घरगुती गणपतीसाठी दोन फूट आणि सार्वजनिक मूर्ती चार फुट ठेवण्यात आली आहे. शासनाच्या या निर्बंधांमुळे  यंदा देखील या कारखानदारांना 60 टक्के नुकसान सहन करावे लागणार आहे. यामुळे, गणेश मूर्तींवरील उंचीची अट शिथील करण्याची  मागणी मूर्तिकार आणि कारखानदारांनी केली असून कोणताही निर्णय घेताना राज्यातील गणेशोत्सव मंडळ आणि संबंधितांशी चर्चा करून नियमावली जाहिर करावी अशी विनंती करण्यात येत आहे. 


गेल्या वर्षभरापासून गणपती कारखानदार आणि मूर्तिकार हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटण्याचा प्रयत्न करीत असून मुख्यमंत्र्यांनी मूर्तीकारांशी चर्चा करून  निर्बंध निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, गणेश मूर्तींवरील निर्बंध कायम ठेवल्यास घरातील दोन कामगारांना सरकारी नोकरी देण्याची मागणी करण्यात येत असून यंदा देखील नुकसान झाल्यास बँकांकडून घेतलेल्या कर्जापोटी आत्महत्या करावी लागणार असल्याची खंत कारखानदार आणि मूर्तिकारांनी व्यक्त केली आहे.