Rahul Narwekar :  राज्यासह देशाचं लक्ष शिवसेना आमदार अपात्रतेच्या (Shiv Sena MLA Disqualification) निकालावर लागले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) हे  निकाल सुनावणार आहेत. आमदारांच्या अपात्रतेवर निकाल देणारे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजकीय प्रवासाची सुरुवात शिवसेनेमधून केली होती. आज त्याच पक्षाबद्दल ऐतिहासिक निकाल राहुल नार्वेकर देणार आहेत. 


शिवसेना ते भाजप व्हाया राष्ट्रवादी


राहुल नार्वेकर यांचा राजकीय प्रवास हा शिवसेनेमधून झाला. आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वातील युवा सेनेतही कार्यरत होते. राहुल नार्वेकर हे मुंबई उच्च न्यायालयात वकिली व्यवसाय करत होते. इंग्रजी वृत्तवाहिन्यांमधील चर्चात्मक, वादविवाद कार्यक्रमात राहुल नार्वेकर हे शिवसेनेची बाजू मांडत असे. एकप्रकारे ते न्यूज डिबेटमध्ये शिवसेनेचा चेहरा होते. 


शिवसेनेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती... 


राहुल नार्वेकर यांनी 2014 च्या सुमारास शिवसेना सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. शिवसेनेकडून विधान परिषदेला नकार दिल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला अशी चर्चा होती. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल नार्वेकर यांना राष्ट्रवादीने मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. मात्र, त्यांचा पराभव झाला. पुढे राष्ट्रवादीने त्यांना विधान परिषदेवर पाठवले. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार म्हणून त्यांनी विधान परिषदेच्या कामकाजात कामगिरी बजावली. 
 
2014  ते 2019  या काळात ते विधान परिषदेचे सदस्य होते. या काळात नार्वेकर यांना ‘उत्कृष्ट भाषणा’साठी राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेचा पुरस्कार मिळाला. त्यांनी मे 2016 मध्ये राष्ट्रकूल संसदीय मंडळ शाखेद्वारे ऑस्ट्रेलिया, न्यूझीलँड  आणि सिंगापूरचा अभ्यास दौराही केला.


भाजपमध्ये प्रवेश... 


2019 च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ सोडून भाजपचे कमळ हाती घेतले. त्यांच्या या निर्णयाची चांगलीच चर्चा झाली. भाजपने त्यांनी कुलाबा मतदारसंघातून उमेदवारी दिली. राहुल नार्वेकरांना या निवडणुकीत 57 हजार 420 मते मिळाली, त्यांनी काँग्रेसचे भाई जगताप यांचा (41 हजार 225 मते) यांचा पराभव केला.


राज्यात सत्तांतर झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार जाऊन शिंदे-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले. हे सरकार स्थापन होताना मोठ्या प्रमाणावर कायदेशीर पेच निर्माण झाला होता. त्यावेळी भाजपने कायद्याची पार्श्वभूमी असलेल्या राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला.  


नार्वेकरांची राजकीय पार्श्वभूमी...


राहुल नार्वेकर यांच्या कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील स्थानिक स्वराज संस्थेमध्ये विविध पदावर काम केलेले आहे. राहुल नार्वेकरांचे वडील हे मुंबई महापालिकेत नगरसेवक होते. तर, त्यांचा भाऊ मकरंद नार्वेकर हे मुंबई महापालिकेत दोन वेळेस नगरसेवक आहेत. तर, त्यांची मेहुणी हर्षतादेखील मुंबई महापालिकेतून नगरसेविका म्हणून निवडून आली. 


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर हे राहुल नार्वेकर यांचे सासरे आहेत.