Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Maharshtra : राहुल गांधी यांच्या नेतृत्वात सुरू असलेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आज महाराष्ट्रात दाखल होणार आहे. संध्याकाळी साडेसात वाजता राहुल गांधी मशाल घेऊन नांदेडमध्ये येणार आहे. भारत जोडो यात्रेचा 14 दिवस महाराष्ट्रात मुक्काम असेल. काँग्रेस नेते अशोक चव्हाण, नाना पटोले आणि बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भारत जोडो यात्रेबद्दल माहिती दिली. भारत जोडो या यात्रेची महाराष्ट्रातील जबाबदारी अशोक चव्हाण यांच्याकडे आहे.  


आज रात्री राहुल गांधी देगलूर वन्नाळी ( प्रसिद्ध गुरुद्वारा ) अशी मशाल यात्रा करणार आहेत. हे नऊ किमीचं अंतर असेल. रात्री साडेबारापर्यंत तिथली पूजाअर्चा करुन परत येताना देगलूरला राहुल गांधी कारने येणार आहेत. आठ तारखेला सकाळी पुन्हा कारने वन्नाळीला जाणार आहेत. तेथून यात्रा पुन्हा सुरु होणार आहे. रात्रीचा मुक्काम शंकरनगरला असेल , त्याआधी गोपाळा गावात कॅार्नर मीटिंग होणार आहे. दहा तारखेला होणाऱ्या सभेला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे नांदेडमध्ये येणार आहेत. त्याशिवाय या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही दहा तारखेला यात्रेत सहभागी होणार आहेत, अशी माहिती अशोक चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


भारत जोडो यात्रा बदल घडवणारी - नाना पटोले
राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ही बदल घडवणारी आहे, ज्याने भाजप नेते भयभीत झाले आहेत. त्यातूनच त्यांच्याकडून काँग्रेसवर विविध प्रकारचे आरोप केले जात आहेत. त्याचप्रमाणे या पदयात्रेमध्ये अनेक व्यापारी दिग्गज सिने अभिनेत्री अभिनेत्यांची सहभागी होण्याची इच्छा असताना त्यांच्यावर भाजपचा दबाव असल्यामुळे त्यांना या यात्रेत सहभागी होता येत नाही, असा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नांदेडमध्ये व्यक्त केलाय. भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने नाना पटोलेंसह काँग्रेसचे नेते नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणावर दाखल झालेत.  


मशाल घेऊन ही यात्रा प्रवेश करणार - थोरात
राहूल गांधी यांच्या स्वागतसाठी नांदेड आणि महाराष्ट्र सज्ज आहे. अशोक चव्हाणांनी महिनाभरापासून ही तयारी केली आहे. मशाल घेऊन ही यात्रा प्रवेश करणार आहे. ही खूप महत्त्वाची बाब आहे, अशी माहिती बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे. अत्यंत उत्साहात जल्लोषात यात्रेत सहभागी व्हायचे आहे. नांदेडची सभा ही 10 नोव्हेंबरला भव्य होईल. शेगावमध्ये राहुल गांधी गजानन महाराज यांचे दर्शन घेऊन सभा घेणार आहेत. या पडयात्रेकडे  सरकारचे लक्ष  आहे, देशातील प्रश्न मांडण्याचा या यात्रेतून प्रयत्न होत आहे.  महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली चळवळ उभी राहिली, त्याच पद्धतीने ही पदयात्रा सुरु आहे, असे थोरात म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्रात येताच राहुल गांधी यांच्या हातात मशाल. क्रांतीचं प्रतिक असल्याने मशाल यात्रा काढत असल्याचं कॅाग्रेसचं म्हणणं आहे. मशाल हे शिवसेनेला नव्याने मिळालेलं अधिकृत निवडणूक चिन्ह आहे


नांदेड जिल्ह्यातील देगलूरमधून भारत जोडो यात्रेची सुरुवात होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील भारत जोडो यात्रेच्या नियोजनासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मागणीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश स्तरावरील 28 पदाधिकारी मदतीसाठी नियुक्त केले आहेत. या यात्रेत महाविकास आघाडीचे नेते सहभागी होणार आहेत. यात्रेला कसा प्रतिसाद मिळतो त्याकडे राज्य सरकारचे लक्ष असेल. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे यात्रेची जाबबादारी आहे. नांदेड जिल्ह्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने यात्रेसाठी 28 पदाधिकारी नियुक्त केले आहेत. सगळे पदाधिकारी सध्या नांदेडला दाखल झालेत. नांदेड जिल्ह्यातील यात्रा पूर्ण होईपर्यंत ते नांदेडलाच मुक्कामी राहणार आहेत.  देगलूरहून सुरू होणारी भारत जोडो यात्रेसाठी महाविकास आघाडी घटक पक्षातील उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अजित पवार, शरदचंद्र पवार यांच्या सह महाविकास आघाडीतील नेत्यांना या यात्रेसाठी काँग्रेस पक्षाकडून आमंत्रण देण्यात आले आहे. भारत जोडो यात्रेमध्ये महाविकास आघाडीमधील नेते सहभागी होण्याची शक्यता आहे. 


राहुल गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेसची  भारत जोडो यात्रा कन्याकुमारी ते श्रीनगर असा 3500 किमीचा प्रवास करणार आहे. कन्याकुमारी ,तामिळनाडू ,कर्नाटक असा प्रवास केल्यानंतर ही पदयात्रा महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे प्रवेश करणार आहे. देगलूरात भारत जोडो यात्रेची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.  अनेक रस्त्यांची डागडुजी, रंगरंगोटीसह अतिक्रमण हटवले जात आहे.  त्यासाठी देगलूर शहरातील शिवाजीनगर विद्यालयादरम्यान मुख्य रस्त्यावर दुभाजकांची मुख रंगरंगोटी करण्यात आलीय. त्यामुळे राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या स्वागताची जय्यत तयारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कडून करण्यात आली.  महाराष्ट्रात राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आल्यानंतर महाराष्ट्र  काँग्रेस पक्ष पातळीवर यात्रेत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होऊन, यात्रा सुरळीत आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी  काँग्रेसमय वातावरण तयार करण्यात आलंय.