Sambhaji Brigade: इतिहासाची मोडतोड करणारा, खोटा इतिहास दाखवणारा "हर हर महादेव" चित्रपट तात्काळ बंद करण्यात यावा. अन्यथा संभाजी ब्रिगेड आपल्या स्टाईलने बंद पाडेल, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष अॅड. मनोज आखरे, महासचिव सौरभ खेडेकर, प्रदेश प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे आणि  केंद्रीय कार्यकारणीची ऑनलाइन बैठक झाली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. कारण या चित्रपटात, इतिहासाची चेष्टा केली आहे. शूरवीरांच्या कर्तुत्वाबाबत खोडसाळपणा केला आहे. इतिहासाची पूर्ण मोडतोड केली आहे. मराठ्यांच्या इतिहासाचा अपमान केला आहे, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे.


संभाजी ब्रिगेडनं म्हटलं आहे की, छत्रपती शिवराय रामदासी वेशात दाखवण्याचा मूर्खपणा केला आहे. कवड्याची माळ घातली आहे तीपण हास्यास्पद. बाजीप्रभू शिवरायांच्या प्रतापगड मोहिमेत दाखवणे म्हणजे इतर मराठा सरदार यांनी शिपायाची भूमिका करण्यासारखे आहे. कान्होजी जेधे खलीता घेऊन बाजीप्रभू यांच्याकडे गेलेले दाखवणे म्हणजे कान्होजी जेधे शिपाई करणे आहे. बांदलं देशमुख खुळी दाखवली, व्यभिचारी दाखवले आहेत. वारंवार मराठी मराठी ह्या शब्दाचा उपयोग केला आहे. पाटील म्हणजे बलात्कारी घाणेरडा दाखवला आहे. राष्ट्रमाता बाजीप्रभूचा सल्ला घेताना दाखवले आहे, असा आरोप देखील संभाजी ब्रिगेडनं केला आहे. 


शिवाय संभाजी ब्रिगेडनं म्हटलंय की,  छत्रपतींना अफजलखानाने जिरे टोपावर वार केलेला दाखवला आहे. डोक्यातून रक्त येताना दाखवले आहे. हा तर मोठा विनोद आहे. छत्रपतींवर वार करणारा कृष्णा भास्कर कुलकर्णी की जो अफजलखानाचा वकील होता. त्याने छत्रपतीवर वार केलेला होता हे न दाखवता अफजलखानानेच वार केला, असं खोटं दाखवले आहे. शिवा काशिदला बाजीप्रभूंनी शोधून आणले असं खोटं दाखवलं आहे. सगळ्यात हास्यास्पद म्हणजे छत्रपतींना नरसिंहचे रूप धारण केले हे दाखवले. त्यांनी अफजलखानाला मांडीवर घेऊन मारले असं दाखवले आहे, असं संभाजी ब्रिगेडने म्हटलं आहे. 


याचबरोबर "वेडात मराठे वीर दौडले सात" या चित्रपटाची स्क्रिप्ट संभाजी ब्रिगेडला दाखवल्याशिवाय प्रदर्शित करू नये. अन्यथा संभाजी ब्रिगेड हा चित्रपट चालू देणार नाही, असा इशाराही दिला आहे.


संभाजी ब्रिगेडने केलेले सवाल
1)  ट्रेलरमध्ये मराठी शब्दांचा वापर वारंवार घेण्यात आला, का मराठा साम्राज्य म्हणायची लाज वाटत होती का?
2) हा चित्रपट कोणत्या साधनांवर अवलंबून प्रकाशित करण्यात आला आहे?
3) संपूर्ण बारा मावळमध्ये बाजीप्रभू देशपांडे हेच एकमेव लढावू होते का?
4) बांदलांच्या कारभारात एक पाटील 60 मुलीबाळींवर बलात्कार करतो आणि बांदल त्याला पाठीशी घालतात, हे कुठल्या आधारे दाखवलं?
5) छत्रपती शिवाजी महाराजांनी समेट करण्याच्या बाबतीत बांदलांशी केलेल्या पत्र व्यवहारात बाजीप्रभू देशपांडे यांचा उल्लेख आढळतो का...?
6) चित्रपटात दाखवल्याप्रमाणे बाजीप्रभू व छत्रपती शिवाजी महाराजांची अशी कोणती लढाई झाली होती?
7) जेधे आणि बांदल घराण्याचे वैर होते पण,बकरी चोरण्यावरून बांदल जेधे एकमेकांची मुंडकी मारायचे..? इतक विकृत स्वरूप होतं का...?
8) अफजल खानाच्या वधाच्या वेळी बाजीप्रभू देशपांडे तिथं होते का..? 
9) अफजल खान डावखुरा होता की उजवा होता हे शिवाजी महाराजांना खाजगीत सांगणारे बाजीप्रभू देशपांडे कुठल्या आधारे दाखवले..?
10) छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातसुद्धा काही प्रोटोकॉल असतील.. हे सुद्धा सध्याच्या फालतू डायरेक्टर लोकांना कळत नसावे का..? उठसूठ कोणीही सरदार शिवाजी महाराजांना खाजगीत जाऊन काहीही सांगू शकत होते का..? हे कोणत्या आधारे दाखवता..?
11) छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाचे वर्णन असताना सुद्धा, तुम्हाला पुचाट आणि पांचट, नकटा सुबोध भावेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेसाठी भेटला का..?
12) सगळ्या सरदारांची भाषा ही रांगडी मराठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांची भाषा मात्र शुद्ध मराठी हे कोणत्या आधारावर..? 
13) छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध नरसिंहासारखा पोट फाडून केला...? ज्या गोष्टी प्रॅक्टिकली आणि लॉजिकली चुकीच्या आहेत त्या तुम्ही धडाधड मोठ्या पडद्यावर दाखवता ? यातून तुम्हाला  काय साध्य करायचं आहे..?