Rahul Gandhi In Kolhapur : लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi In Kolhapur) यांनी संविधान बचावचा नारा देत भाजपला आव्हान निर्माण केले. आणि त्याचा प्रत्यय सुद्धा लोकसभा निवडणुकीमध्ये निकालानंतर आला. भाजपकडून 400 चा नारा हा संविधान बदलण्यासाठीच असल्याचा घणाघात सातत्याने राहुल गांधी यांनी केला होता आणि तो आवाज कुठेतरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्याचे लोकसभा निकालातून दिसून आले. आता महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. गेल्या महिन्याभरात दुसऱ्यांदा राहुल गांधी यांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा करत महाराष्ट्रासाठी आता आपण विशेष रणनीती तयार केली असल्याचे दाखूवन दिले. कोल्हापूरमध्ये राहुल गांधी यांचा दोन दिवस दौरा होता. तथापि, चार ऑक्टोबर रोजी राहुल गांधी यांचा दौरा विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने रद्द करण्यात आला. मात्र, दुसऱ्या दिवशी काल शनिवारी सर्व कार्यक्रम पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार घेण्यात आले. या कार्यक्रमातून आमदार सतेज पाटील यांनी पुन्हा शक्तीप्रदर्शन केले. राहुल गांधी यांच्या दौऱ्याइतकीच त्यांच्या काटेकोर नियोजनाची सुद्धा चर्चा रंगली. राहुल गांधी यांनी पहिल्या दिवशी दौरा रद्द झाल्याने त्यांनी माफीही मागितली.



शिवरायांच्या विचारांची संविधानावर छाप 


राहुल गांधी यांच्या हस्ते कसबा बावड्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमामध्ये बोलताना राहुल गांधी यांनी संविधान आणि शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कर्तृत्वाची जोड देत सुरेख मिलाप साधला. हे भाषण करत असताना शिवरायांच्याच विचारांचे प्रतिबिंब संविधानामध्ये असल्याचे सांगत हेच संविधान संपण्याचा घाट भाजपकडून घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. इतकेच नव्हे तर शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ज्या प्रवृत्तीने विरोध केला त्या प्रवृत्ती विरोधात आपली लढाई सुरू असल्याचे सांगत एक प्रकारे महाराष्ट्राच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये हाच मुद्दा केंद्रस्थानी राहील हे राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा ठणकावून सांगितले. सिंधुदुर्गमध्ये झालेल्या पुतळा दुर्घटनेची सुद्धा त्यांनी जोड भाजपला नियत योग्य नसल्याचा टोला लगावला.


 राजर्षी शाहूंना समाधीस्थळी अभिवादन


राहुल गांधी यांचा पुतळा अनावराचा कार्यक्रम पार पडल्यानंतर ते देशातील आरक्षणाचे जनक करवीर नगरीचे विधाते छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळी अभिवादन करण्यासाठी पोहोचले. याठिकाणी तीन पीढ्यांपासून काँग्रेसशी संबंध शंकरराव माने कुटुंबीयांची भेट घेतली. इतिहासकार इंद्रजित सावंत आणि शाहीर दिलीप सावंत यांचीही त्यांनी भेट घेतली. त्यानंतर राहुल गांधी यांच्या उपस्थितीत हॉटेल सयाजीमध्ये संविधान संमेलन पार पडले. राहुल गांधी यांनी संविधान संमेलन करत असताना त्या व्यासपीठावर कोणतीही राजकीय व्यक्ती असणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतली. कार्यक्रमाचे नियोजन अतिशय नेटक्या पद्धतीने केले असतानाही सतेज पाटील यांच्यासह राज्यातील दिग्गज काँग्रेस नेते सुद्धा व्यासपीठामसोर पहिल्या रांगेत बसल्याचे दिसून आले.



जातीय जणगणना करणार, आरक्षणाची मर्यादा तोडणार! 


संविधान संमेलनमधून सुद्धा राहुल गांधी यांनी भाजपवर घणाघात करताना कोणत्याही परिस्थितीत भाजप आणि आरएसएसकडून कितीही विरोध झाला तरी आरक्षणाची मर्यादा वाढवणार असल्याचे ठणकावून सांगितलं. गेल्या काही दिवसांपासून संविधान आणि आरक्षण हे मुद्दे देशपातळीवर सर्वाधिक चर्चिले जात आहेत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने मराठा समाजाकडून आरक्षणाची मागणी केली जात आहे. ते आरक्षण स्वतंत्र न देता 50 टक्क्यांमधून दिलं जावंं अशी प्रामुख्याने मागणी होत आहे. मात्र घटनादुरुस्ती होत नाही तोपर्यंत 50 टक्क्यांमध्ये मराठ्यांचा समावेश होऊ शकत नाही हे वास्तव आहे. त्यामुळे विधानसभा मराठा आरक्षण मुद्दा केंद्रस्थानी असतानाच राहुल यांनी 50 टक्क्यांची भिंत तोडणार असल्याचे सुतोवाच केले आहेत. काँग्रेस आणि इंडिया आघाडी सत्तेत आल्यानंतर हे काम करणार असल्याचे ते म्हणाले. 


थेट दलिताच्या घरी जात स्वयंपाक घराचा ताबा


राहुल गांधी यांचा नियोजित दौरा शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करून शाहू महाराजांच्या समाजाची दर्शन आणि हॉटेल सयाजीमध्ये संविधान संमेलनासाठी पोहोचणार होते. मात्र राहुल गांधी यांचा कोल्हापूर दौरा लक्षात घेत भाजपकडून सुद्धा आंदोलनाची हाक देण्यात आली होती. पहिल्यांदा हे आंदोलन ताराराणी चौकामध्ये करण्यात येणार होते. मात्र तेथून ते आंदोलन नंतर भाजप कार्यालयासमोर करण्यात आले. मात्र राहुल गांधी यांनी कोल्हापूरमध्ये आगमन झाल्यानंतर वेगळीच खेळी करताना थेट त्यांनी मार्गच बदलून टाकला. आणि राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेल्या उचगाव गावांमध्ये पोहोचले. गावामधील टेम्पोचालक अजयकुमार सनदे या दलित कुटुंबाच्या घरी त्यांनी अचानक भेट देत व त्या ठिकाणी थेट स्वयंपाक गृहामध्ये प्रवेश केला. स्वयंपाकघरात जेवण सुरू असतानाच त्यांनी स्वतःच जेवण करून त्या जेवणाचा आस्वाद घेतला. त्यामुळे त्यांनी शाहूंच्या भूमीतून जो संदेश एका कृतीमधून द्यायचा होता तो त्यांनी त्यातून दिला असल्याचे चर्चा सर्वाधिक रंगली. त्यामुळे भाजपच्या आंदोलनाचा आपल्या दौऱ्यावर कोणताही परिणाम होणार नाही याची पुरेपूर काळजी राहुल गांधी यांनी घेतल्याचे दिसून आले. 


संविधान संमेलनात आरक्षण आणि जातीय जणगणनेवर भर 


संविधान संमेलनामध्ये बोलताना राहुल गांधी यांच्याकडून आरक्षण आणि संविधान हेच मुद्दे केंद्रस्थानी होते. देशाच्या प्रशासकीय व्यवस्थेमध्ये मागास, ओबीसींना किती स्थान दिले जातं हे आकडेनिहाय सांगण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जोपर्यंत जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत ही स्थिती आपल्यासमोर येणार नसल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीमध्ये जातीय जनगणना करण्यासाठी कायद्यामध्ये दुरुस्ती करणार असल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यामध्ये पुन्हा एकदा संविधान आणि आरक्षण हे दोन मुद्दे राहुल गांधी यांच्याकडून केंद्रस्थानी असतील याची झलक कोल्हापूर दौऱ्यामध्ये मिळाली आहे.


राहुल गांधी यांनी पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक महिन्यात दोन दौरे करत एक प्रकारे महाराष्ट्राकडे सर्वाधिक लक्ष असल्याचे दाखवून दिलं आहे. दोन दिवसापूर्वी शरद पवार यांनी सुद्धा आरक्षणाचे मर्यादा वाढवून ती 75 टक्क्यांपर्यंत करावी आणि आम्ही त्याला पाठिंबा देऊ अशी मागणी केंद्र सरकारकडे केली होती. या विधानानंतर राहुल गांधी यांनी कोल्हापूरमध्ये थेट आम्ही आरक्षणाची मर्यादा ओलांडणार आहोत असे सांगत एक प्रकारे त्यांच्या भूमिकेला समर्थन दिल्याचं दिसून आलं. त्यामुळे राहुल गांधी यांच्याकडून आरक्षण, जातीय जनगणना, संविधान बचाव मुद्दा महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रकर्षाने मानला जाईल हे आता जवळपास सिद्ध झालं आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या