Sanjay Raut शिर्डी : विखे पाटील महसूल नाही तर आमसूल मंत्री आहेत, असा टोला शिर्डीत दाखल होताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आदलाबदली संदर्भात अद्याप काहीही चर्चा झाली नाही. मात्र शंकरराव गडाख त्या जागेसाठी योग्य आणि प्रबळ उमेदवार असल्याचे विधान त्यांनी यावेळी केले आहे. 


शिर्डी येथे पत्रकारांशी संवाद साधताना राऊत बोलत होते. नाशिक येथील दौरा आटोपून संजय राऊत थेट शिर्डीला साई दर्शनाला पोहोचले.  यावेळी विखे पाटील यांच्या कट्टर विरोधक समजल्या जाणाऱ्या प्रभावती घोगरे राऊत यांच्या स्वागताला आल्या होत्या. त्यामुळे भविष्यातील विखे विरोधक उमेदवार अशी चर्चा सुरू आता शिर्डीत रंगली आहे.


महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा


संजय राऊत म्हणाले की,  मी महाराष्ट्रातील स्वाभिमानी राजकारणी आहे. राज्यावर सध्या जे संकट आहे ते दूर व्हावे. महाराष्ट्र गुलामगिरी मुक्त व्हावा. शेतकरी, कष्टकरी आणि बेरोजगारांना चांगले दिवस येण्यासाठी राज्यात चांगले सरकार यावे यासाठी संजय राऊत यांनी साई चरणी प्रार्थना केल्याची माहिती दिली. 


तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत असतील


शिर्डी लोकसभेबाबत संजय राऊत म्हणाले की, ठाकरे गट वैगरे आम्ही मानत नाही.बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली. तेव्हा एकनाथ शिंदे गोधडीत असतील, असा टोला त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. शिर्डी लोकसभेच्या जागेसाठी शिवसेनेकडे इच्छुकांची संख्या वाढत आहे. याचा अर्थ मुळ शिवसेनेकडे ताकद आहे. आमची जिंकण्याची क्षमता किती आहे हे सर्वांना माहिती असल्याचे वक्तव्य त्यांनी केले. 


शंकरराव गडाख 'त्या' जागेसाठी योग्य


नगर दक्षिणची जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. आदला बदलीसंदर्भात अद्याप कुठलीही चर्चा झाली नाही. मात्र शंकरराव गडाख त्या जागेसाठी योग्य आणि प्रबळ उमेदवार आहेत, असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. 


त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची?


आमदार अपात्रता निकालावर संजय राऊत म्हणाले की, विधानसभा अध्यक्षांवर न्यायदानाची जबाबदारी असते. सोकॉल्ड न्यायमूर्तींनी मुख्यमंत्र्यांकडे जाऊन बंद दाराआड चर्चा केली. न्यायमूर्ती चुकताना दिसत आहेत. न्यायमूर्ती आरोपींकडे जाऊन चहा प्यायला लागले. त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? असा सवाल त्यांनी यावेळी केला.


इतके वर्ष डोक्यावरचे केस उपटत होता का?


महानंद डेअरीचे चेअरमन राजेश परजणे यांचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, तुम्ही काय इतक्या वर्ष डोक्यावरचे केस उपटत होता काय? संस्था चालवता आली नाही म्हणून NDDB कडे देण्याची वेळ आली. लोकांचे पगार नाही, उत्पादन क्षमता घटली, वितरण कमी झाले याला जबाबदार कोण? तुमच्या खाजगी डेअरी व्यवस्थित चालवता. सरकारची संस्था चालवत नाही. तुमच्या 27 एकर जमिनीवर काही लोकांचा डोळा आहे. चेअरमन परजणे यांच्यावर टिका करण्याचे माझे काही कारण नाही.मात्र राज्यातील उद्योग आणि संस्था गुजरातकडे गेली तर महाराष्ट्राचे कसे होणार? असेही त्यांनी यावेळी म्हटले. 


सुप्रिया सुळेंची मागणी योग्यच


शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या श्वेत पत्रिकेची मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. याबाबत ते म्हणाले की, सुप्रिया सुळेंची मागणी अत्यंत योग्य आहे. शासन आपल्या दारीच्या निमित्ताने होणारा वारेमाप खर्ज हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा घोटाळा आहे, अशी टीका संजय राऊत यांनी यावेळी केली.  


फडणवीसांचे नाटक साफ कोसळणार


उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत संजय राऊत म्हणाले की, फडणवीसांचे नाटक लवकरच पडणार आहे. त्यांचे नवीन नाटक साफ कोसळणार असा टोला त्यांनी लगावला आहे.