नांदेड : मराठा आंदोलनाच्या दबावालाखाली येऊन सरकारने असा कोणताही जीआर काढू नयेत, अन्यथा ओबीसींना (OBC) देखील रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. तसेच, असे झाल्यास सरकारचं सत्यानाश करायला ओबीसीला वेळ लागणार नाही, असा थेट इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे (Prakash Shendage) यांनी सरकारला दिला आहे. विशेष म्हणजे आमच्या मागण्यासाठी आम्ही आझाद मैदानावर (Azad Maidan) आंदोलन करणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. 


मराठा समाजाने 20 जानेवारीपासून आंदोलन करण्याची घोषणा केली आहे. फक्त मराठाच आंदोलन करतात असं काही नाही. आमचा दलित आणि ओबीसी देखील आंदोलन करू शकतो. आमच्याही काही प्रलंबित मागण्या आहेत. आमचं एवढंच म्हणणं आहे की, आमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागू नयेत. यांचा तीन कोटी समाज दहा लाख गाड्या घेऊन येणार, त्यात हजार कोटींचे डिझेल-पेट्रोल घालून येणार आहे. त्यामुळे या गरीब मराठा समाजाच्या आंदोलनाला बळी पडून, सरकारने रात्री बे रात्री एखादा जीआर काढला. तर आम्हाला देखील आंदोलनाची भूमिका घ्यावी लागेल. त्यामुळे यांच्या दबावालाखाली येऊन सरकारने असा कोणताही जीआर काढू नयेत, असे ओबीसी नेते प्रकाश शेंडगे म्हणाले. 


जातीनिहाय जनगणना करा...


जातीनिहाय जनगणना करण्याची आमची मागणी सर्वांनीच मान्य केली आहे. मुख्यमंत्री शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी देखील ही मागणी मान्य केली आहे. विधानसभेतील सर्व आमदारांनी देखील एक मताने ठराव पारित केला आहे. मंग ही जातगणना का होत नाही. त्यामुळे जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही, तोपर्यंत आझाद मैदानावर आमचं आंदोलन सुरूच राहणार आहे. जिल्ह्यात देखील आंदोलन सुरू राहणार आहे. मराठा समाजाला देण्यात आलेल्या निधीनुसार ओबीसींच्या मुलांना देखील निधी दिला पाहिजे. त्यामुळे आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचं देखील आंदोलन सुरूच राहणार आहे आणि तोपर्यंत सरकारला सुट्टी नाही, असे प्रकाश शेंडगे म्हणाले.


सरकारला घराचा रस्ता दाखवण्याची ताकद महाराष्ट्रातील ओबीसींमध्ये 


सुरुवातीला निजाम कालीन काही नोंदी सापडत असल्याने आम्ही त्या मान्य केल्या होत्या. आता सरसकट मराठा आणि सरसकट महाराष्ट्र हे काय चाललं महाराष्ट्रात, आणि हे आम्ही मुळीच होऊ देणार नाही. तरीही सरकारने असं काही केल्यास 2024 च्या रणसंग्रामामध्ये त्यांना घराचा रस्ता दाखवण्याची ताकद महाराष्ट्रातील ओबीसीमध्ये असल्याचं प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. 


सरकारचं सत्यानाश करायला ओबीसीला वेळ लागणार नाही


गेल्या 75 वर्षांपासून महाराष्ट्राची सत्ता मराठा समाजाच्या हातामध्ये आहे. सगळे मुख्यमंत्री, मंत्री त्यांचे आहेत. शेती, उद्योगात देखील तेच आहेत. या सत्तेच्या माध्यमातून ते असे काही जीआर काढून आमच्या आरक्षणाचा सत्यानाश करणार असेल, तर या सरकारचं सत्यानाश करायला ओबीसीला वेळ लागणार नाही. याला सत्ता संघर्ष म्हटलं तरी चालेल. आमच्या आरक्षणाला जर धक्का लावला आणि त्याचे तीन तेरा केल्यास, सरकारचे तीनतेरा करण्यासाठी आम्हाला यांचे आमदार पाडावे लागतील. तसेच ओबीसीची सत्ता आम्हाला आणावीच लागेल, असेही प्रकाश शेंडगे यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


'धनगर, वंजारी आरक्षणावर बोलणारे अर्धवटराव'; गोपीचंद पडळकरांची जरांगेंवर अप्रत्यक्ष टिका