Pune News :  मागील दोन आठवड्यापासून पुण्यातील (Pune) वातावरणात बदल होत आहेत. रात्री (Weather) तापानात घट आणि दिवसा उन्हाचे चटके जाणवत आहेत. या वातावरणाच्या बदलामुळे पुणेकरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास होत आहे. मागील काही दिवसांपासून डॉक्टरांकडे संसर्गाच्या अनेक तक्रारी आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.


दोन महिन्यांपासून पुण्यातील वातावरणात चढउतार सुरु आहेत. दर आठवड्यात तापमानात कधी घट तर कधी वाढ होत आहे. यामुळे अनेकांच्या आरोग्यावर देखील परिणाम दिसून लागले आहे. मागील आठवड्यापासून हवामानात आणि पुण्यातील हवेत बदल झाले आहे. पुण्यातील हवाही प्रदूषित झाली आहे. या दोन्ही कारणामुळे निम्मे पुणे आजारी असल्याचं समोर आलं आहे. 


कोणत्या आजाराने पुणेकर त्रस्त?


वातावरणात घट झाल्याने पुणेकरांना कोरडा खोकला, सर्दी, ताप, उलट्या अशा अनेक रुग्णांच्या तक्रारी आहेत. दरवर्षी ऋतू बदलामुळे अशा प्रकरणांमध्ये वाढ होते. घरात एकाला संसर्ग झाला की कुटुंबातील सगळ्यांना संसर्ग होतो, त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टरांनी केलं आहे. 


लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक रुग्ण


वातावरण बदलाचा जास्त परिणाम लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांवर जास्त प्रमाणात होत आहे. त्यांना सर्दी खोकल्या बरोबरच अपचन आणि उलट्यांच्या तक्रारी डॉक्टरांना आल्या आहेत. लहान मुलांच्या आरोग्यात काही तक्रारी आढळल्यास तातडीने डॉक्टरांना सल्ला घ्या आणि तातडीने उपचार करा, असंही डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यासोबतच ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य जपण्याचा सल्ला दिला आहे. 


संसर्ग होऊ नये यासाठी काय कराल?


- थंडीमुळे अनेकांना घसा बसण्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे गरम पाणी प्या.
- घराबाहेर पडताना लहान मुलांना उबदार कपडे घाला.
- वातावरणातील प्रदूषणात वाढ झाली आहे. त्यामुळे मास्क वापरा.
- संसर्ग झालेल्या नागरिकांपासून थोडं लांब रहा. 
- लहान मुलांच्या आरोग्यात बदल जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या.


दहापैकी पाच रुग्णांना व्हायरल ताप 


प्रत्येक 10 रुग्णांपैकी पाच रुग्णांना व्हायरल ताप आहे. त्यासोबतच अनेकांना कोरडा खोकला आणि सर्दीच्या तक्रारी आहेत. ज्येष्ठ नागरिकांना अपचन आणि उलट्यांचा त्रास होत आहे.


प्रदूषणामुळेही श्वसनाचे आजार


मागील काही दिवसांपासून पुण्यातील हवेची पातळी खालावली आहे. शहरातील वाहतूक वाढल्याने आणि वातावरणातील आर्द्रता वाढल्याने हवेतील गुणवत्ता बिघडली आहे. याचा परिणाम नागरिकांवर होत आहे. त्यांना श्वसानाच्या आजारांना सामोरं जावं लागत आहे. दोन दिवस हवा प्रदूषित राहणार आहे.