Aurangabad News: औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न (Aurangabad Water Issue) काही सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे. अशात औरंगाबाद खंडपीठाच्या (Aurangabad Bench) आदेशानुसार महापालिकेने शहरातील 60 टक्के भागाला तीन दिवसांआड, तर 40 टक्के भागाला पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याचा प्रयोग 1 जानेवारीपासून सुरू केला आहे. पण जायकवाडी धरणातून (Jayakwadi Dam) येणाऱ्या दोन्ही मुख्य जलवाहिनी जुन्या झाल्या असून, सतत फुटत असल्याने सुरळीत पाणीपुरवठा करतांना औरंगाबाद महानगरपालिकेची (Aurangabad Municipal Corporation) दमछाक होत आहे. आता पुन्हा रविवारी सिडको-हडकोसह शहराला पाणीपुरवठा करणारी 1200 मिमी व्यासाची जलवाहिनी पैठण रोडवर पिंपळवाडी येथे फुटली. दुरुस्तीसाठी तब्बल अडीच ते तीन तास लागले. त्यामुळे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. काही वसाहतींना उशिराने, तर काहींना उद्या पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.


रविवारी सकाळी पिंपळवाडी येथे जलवाहिनीला जोडलेला पत्र्याचा जोड पूर्णपणे कापला गेला. पत्र्याचा जोड आदल्यादिवशी शनिवारी सायंकाळपासूनच हळूहळू निखळत होता. त्यामुळे पाणीपुरवठा सुरूच ठेवण्यात आला. रविवारी सकाळी 11 वाजता तो पूर्णपणे फाटल्यानंतर उपसा बंद करण्यात आला. त्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या टीमने लगेच दुरुस्तीचे काम हाती घेतले. जलवाहिनीला दिलेला पत्र्याचा जोड उपलब्ध करण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. दुपारी पावणेदोन वाजेनंतर दुरुस्तीचे काम उपसा सुरू करण्यात आला. त्यानंतर जलकुंभांत पाणी पडले. जलवाहिनीचे काम पूर्ण झाल्यानंतर जायकवाडीतून जायकवाडीतून फारोळा जलशुद्धीकरण केंद्रात पावणेचार वाजता पाणी आले. 


काही वसाहतींना एक दिवस उशिराने पाणी


तब्बल साडेपाच तास शहराचे पाणी बंद होते. त्यामुळे सिडको भागातील जलकुंभ पूर्णपणे रिकामे झाले. जुन्या शहरातही याचा परिणाम दिसून आला. तर आता काही वसाहतींना एक दिवस उशिराने पाणी मिळेल, अशी दिलगिरी व्यक्त करत महानगरपालिकेने कळवले आहे. तर जलकुंभांत पाणी आल्यानंतर हळूहळू शहरातील पाणी वितरणाचे विस्कळीत टप्पे सुरळीत करण्याचे पाणीपुरवठा विभागाने प्रयत्न केले जात आहे. 


न्यायालयाच्या आदेशानंतर मनपाला लागली कामाला... 


औरंगाबाद शहरातील पाणीप्रश्न कित्येक वर्षांपासून कायम आहे. त्यामुळे याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. तर सुनावणीवेळी न्यायालयाने अनेकदा मनपाला खडेबोल सुनावले होते. दरम्यान 1 जानेवारीपासून शहरातील 60 टक्के भागाला तीन दिवसांआड, तर 40 टक्के भागाला पाच दिवसांआड पाणीपुरवठ्याचा प्रयोग करण्याची माहिती महानगरपालिकेने न्यायालयात दिली होती. पण सततच्या तांत्रिक अडचणी येत असल्याने सुरळीत पाणीपुरवठा करतांना महानगरपालिकेची दमछाक होत आहे.