Pune Water Supply : मॉन्सूनच्या लांबलेल्या आगमनाच्या झळा एरवी मुबलक पाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या पुणे आणि पिंपरी - चिंचवडला बसू लागल्या आहेत. या दोन्ही शहरांमध्ये दरररोज हजारो टॅंकर्सच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. ज्यावर नागरिकांना लाखो रुपये खर्च करावे लागत आहेत. तर दुसरीकडे मान्सून लांबल्यानं पुढील महिन्यापासून आणखी पाणीकपात करावी लागू शकते, असा इशारा महापालिकेने दिला आहे.
पुण्याच्या कात्रज भागातील 600 फ्लॅट्स असलेल्या पुराणिक हाऊसिंग सोसायटीत दररोज पंचवीस टॅंकर्सनी पाणी विकत घ्यावं लागत आहे. त्यासाठी या सोयटीतील रहिवाशांना प्रत्येक महिन्याला बारा लाख रुपये मोजावे लागत आहेत. लाखों रुपये खर्च करून या ठिकाणी घर घेतलेले नागरिक पाण्याच्या प्रश्नामुळे मेटाकुटीला आलेत. पिंपरी चिंचवड शहरातील हाऊसिंग सोसायट्यांची अवस्था तर याहून भीषण बनली आहे. लहान - मोठ्या सहा हजार हजार सोसायट्या आहेत. बहुतेक सोसायट्यांमध्ये महापालिकेचे पाणी अपुरं पडत असल्यानं त्यांच्यासाठी अकराशे टॅंकर्स दरररोज पाणी पुरवत आहेत. ज्यासाठी या सोसायट्यांना महिन्याला तब्ब्ल अठरा कोटी रुपये मोजावे लागत आहेत. म्हणजे वर्षाला तब्ब्ल दोनशे कोटी रुपये या सोसायट्यांना पाण्यात घालावे लागत आहेत.
चार धरणांमध्ये मिळून साडेचार टी एम सी पाणी शिल्लक
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांमध्ये मिळून साडेचार टी एम सी पाणी शिल्लक राहिलं आहे. यातील मृत साठा वगळता अडीच टी एम सी पुण्यासाठी वापरता येणार आहे तर पिंपरी - चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पवना धरणात वीस टक्के पाणी शिल्लक राहिलंय. हे पाणी 15 जुलैपर्यंत पुरेल आणि तोपर्यंत पाऊस येईल, असं गृहीत धरून दोन्ही महापालिकांनी नियोजन केलं होतं. पुण्यामध्ये सध्या दर गुरुवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे तर पिंपरी - चिंचवडमध्ये एक दिवसाआड पाणी देण्याची वेळ आली आहे. मात्र लांबलेला मॉन्सून पाहता जुलैच्या सुरुवातीपासूनच ही पाणीकपात आणखी वाढवली जाण्याची चिन्हं आहेत. पुणे महापालिकेकडून दररोज बाराशे टॅंकर्सनी पाणीपुरवठा केला जातो. मात्र सोसायट्यांकडून पैसे मोजून विकत घेतल्या जाणाऱ्या टॅंकर्सची संख्या अधिक आहे. पाणी भरण्यासाठी टॅंकर्सची मोठी रांग पाहायला मिळते. टॅंकर्सची संख्या आणि उशीरा येणाऱ्या पावसामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर आता पाणी कपातीचं संकट ओढवणार असल्याचं चित्र स्पष्ट दिसत आहे. त्यामुळेच पाणी जपून वापरण्याच आवाहन सातत्याने केलं जात आहे.